रेल्वेने एसी लोकल चालवण्यासाठी सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करत त्या जागी एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाकरमान्यांध्य मोठा असंतोष पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून याविरोधात आंदोलनही करण्यात येत आहे. तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही याप्रकरणी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, मध्य रेल्वेने आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी दुपारी २ वाजता सीएसएमटी येथील विभागीय व्यवस्थापकीय कार्यालयात जितेंद्र आव्हाड यांनी एसी लोकलच्या प्रश्नावरुन रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. जवळपास दोन तास याप्रकरणी बैठक झाली. सामान्य लोकलमधून सुमारे ४ ते ५ हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे एक लोकल रद्द केल्याने हजारो प्रवाशांनी प्रवास करायचा कसा, असा सवाल आव्हाडांनी यावेळी उपस्थित केला. मात्र, या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही. उलट मध्य रेल्वेने आपल्या भूमिकेवर ठाम असून घेतला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी तापणार हे निश्चित आहे.
सकाळची वेळ ही नवी मुंबई, ठाणे आणि उपनगरातून चाकरमान्यांची शहरात येण्याची वेळ असते. त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात हे सर्व प्रवासी प्रवासासाठी फक्त लोकलवर अवलंबून असतात. त्यामुळे सकाळच्या वेळेत एकही लोकलही रद्द झाली तरी ४ ते ५ हजार लोकांचा खोळंबा होतो. त्यामुळे लोकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होते. अशात रेल्वेने लोकलच्या काही फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांचे फार हाल होत आहे. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाडांने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
इतकंच नाही तर प्रवासी संघटनांनीही रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी आपला एसी लोकलला विरोध नाही, मात्र, सर्वसामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करुन एसी लोकल वाढवल्या असतील आणि त्याचा सर्वसामान्यांना त्रास होत असेल तर त्याचा रेल्वेने विचार करावा, तसेच एसी लोकलचं भाडं कमी करता येईल का, काही सूवर्णमध्य साधता येईल का, अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे. जर याप्रकरणात लवकर काही तोडगा निघाला नाही तर मध्य रेल्वेविरोधात मोठं जनआंदोलन पाहायला मिळू शकतं.