देशातील दोन अग्रगण्य दूधाचे ब्रँड असलेल्या अमूल दूध आणि मदर डेअरीने दुधाच्या किंमतीत प्रतिलीटर २ रूपये प्रतिलिटरने वाढ केली आहे. ही दरवाढ १६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच १७ ऑगस्टपासून होणार आहे, असे या कंपन्यांनी अधिकृतरित्या जाहीर केले आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर मात्र ताण येणार आहे.
एकीकडे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दरवाढ होताना दिसत आहे. तर अलिकडच्या काळातच गॅस सिलेंडर, तेल, तसेच भाज्यांचे दरही वाढल्याचे पाहायला मिळाले आहेत. अशातच आता दुधाचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. दरम्यान, देशभरात दूध पुरवठा करणारी सर्वात मोठी कंपनी अमूल आणि मदर डेअरीने दूध दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
गुजरात सहकारी दूध विपणन फेडरेशन अर्थात अमूल डेअरीने दुधाच्या दरवाढीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी असे सांगितले की, अमूल दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मार्किटिंगविभागाकडून दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. गुजरातमधील अहमदाबाद, सौराष्ट्र, दिल्ली एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबई आणि इतर ठिकाणी अमूलच्या दुधात १७ ऑगस्टपासून अर्थात येत्या बुधवारपासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे. दरम्यान, मदर डेअरीने देखील दुधाच्या किंमतीत दरवाढ केली आहे. याबाबत पीटीआय वृत्तसंस्थेने माहिती दिली असून त्यात असे म्हटले की, मदर डेअरीने दुधाच्या दरात २ रूपये प्रतिलिटर वाढ केली असून बुधवारपासून ही दरवाढ केली जाणार आहे.