मुंबई : शिंदे गटाच्या आमदाराने सरकारच्याच एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. तुम्ही कायदा हातात घेत आहात. सत्ता आली म्हणून तुम्हाला मस्ती आली का? व्यक्ती सरकारमधील असो की, शेवटच्या घटकातील कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. मारहाण करणाऱ्याला थांबवले का नाही? असा सवाल करीत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे – भाजप सरकारवर हल्ला चढवला. ते आज माध्यमांशी बोलत होते.
हिंगोलीचे आमदार संजय बांगर यांनी कामगारांना निकृष्ट अन्न दिल्याचा आरोप करीत एका कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यावरुन अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली.
अजित पवार म्हणाले, पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी आमदार मारहाण करून अशी भाषा वापरतो कसा, अशीच भाषा जर तुम्ही वापरत असाल तर चांद्यापासून बांद्यापर्यंत व्यक्तीने काय करायला हवे, या गोष्टी सर्वत्र पसरतात, अशा गोष्टी पुढे येण्यापेक्षा बगल देत असलेली कामे करा.
राज्य विधिमंडळाचे पावसाची अधिवेशन उद्या म्हणजेच 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान सह्याद्री अतिथीगृहावर आज संध्याकाळी पाच वाजता चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तथापि, विरोधकांनी या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत पावसाळी अधिवेशनाच्या कमी कालावधीवरून टीका केली आहे.
शेतकरी हवालदिल
अजित पवार म्हणाले की, “राज्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल आहेत. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करावी. एनडीआरएफचे निकष हे अतिशय तुटपुंजे आहेत. सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. शेतकरी असतील, विद्यार्थी असतील या सर्वांना तातडीने मदत जाहीर केली पाहिजे.”
तातडीने मदत करा
अजित पवार पुढे म्हणाले की, सरकार कुणाचेही असो शेतकऱ्याला तातडीने मदत दिली पाहिजे. पीक कर्जाचा आम्ही आढावा घेतला, ऑगस्ट उजाडूनही अनेक ठिकाणी ते देण्यात आलेले नाही. मराठवाड्यात गोगलगायीमुळे सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासंबंधी उपाययोजना आवश्यक आहेत. हे महत्त्वाचे विषय सोडून भलतेच अवांतर विषय काढले जात आहे. वंदे मातरमला विरोध असण्याचं कारण नाही, पण त्याचं औचित्य काय होतं? पेट्रोल-डिझेलचे दर निम्मे करणार असं हे म्हणत होते, पण यांनी दोन-तीन टक्केच दर कमी केले. यांच्यातील काही नेते महाराष्ट्र पेटेल अशी भाषा वापरतात, असेही अजित पवार म्हणाले.
मंत्रिमंडळाची बैठक
दरम्यान, चहापानाच्या कार्यक्रमानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. शिंदे सरकारच्या खातेवाटपानंतरची ही पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार आहेत.
आठवडाभर अधिवेशन
शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून त्यांचा हा पहिलाच पावसाळी अधिवेशन असणार आहे. 17 ऑगस्टपासून अधिवेशनाला सुरूवात होणार असून तो 25 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशन हे 18 जुलै रोजी होईल असे घोषित करण्यात आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे.
सदस्यांची यादी जाहीर
दरम्यान, 17 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीवरील सदस्यांची नामनियुक्त यादी जाहीर करण्यात आली. 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत जरी अधिवेशन होणार असले तरी यामध्ये तीन दिवसांच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज हे सहा दिवसच चालणार आहे. 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक 20, 21 ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
अधिवेशनाचे कामकाज
पावसाळी अधिवेशन बुधवार 17 ऑगस्टपासून विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या यापूर्वी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.