काश्मीरमध्ये चित्रपट रसिक सप्टेंबरपासून मोठ्या पडद्यावर चित्रपटांचा आनंद घेऊ शकतील. कारण, पुढच्या महिन्यात सोनवर भागात खो-यातील पहिले मल्टिप्लेक्स सुरु होणार आहे.
आघाडीची साखळी चित्रपटगृह कंपनी आयनाॅक्सच्या भागीदारीतून या मल्टिप्लेक्सची उभारणी करण्यात येत आहे. यात एकूण तीन चित्रपटगृहे असतील व 520 प्रेक्षक बसू शकतील, असे या मल्टिप्लेक्सचे मालक विजय धर यांनी सांगितले. पुढील महिन्याच्या प्रारंभी हे मल्टिप्लेक्स रसिकांच्या सेवेत रुजू होण्याची आशा आहे.
दहशतवाद्यांच्या धमकीमुळे पडदे होते बंद
1980 च्या दशकापर्यंत खो-यात डझनभर सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे होती. तथापि, दोन दहशतवादी संघटनांनी चित्रपटगृह मालकांना धमकावल्यानंतर या चित्रपटगृहांच्या पडद्यावर काळोख पसरला. 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रशासनाने चित्रपटगृहे पुन्हा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र सप्टेंबर 1999 मध्ये लाल चौकाच्या ह्रदयस्थानी असलेल्या रिंगल चित्रपटगृहात दहशतवाद्यांनी ग्रेनेड स्फोट घडवून आणल्यानंतर, या प्रयत्नांना धक्का बसला.