बातमीदार – संतोष सकपाळ
मुंबई, : मुंबईच्या किनारपट्टीचं प्रदूषित खाड्यांपासून रक्षण करण्यासाठी सरसावले मूळचे संरक्षक सरसावले आहेत. बॉम्बे61 स्टुडिओतर्फे मिनिस्ट्री ऑफ मुंबईज मॅजिक (एमएमएम) आणि टॅपेस्ट्री यांच्या सहकार्याने ‘‘राजा दर्याचा, संरक्षक खाडीचा’’ हा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालामध्ये शहरी कचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थानामुळे किनारपट्टीवरील मुंबईच्या मच्छीमार समाजावर तसेच त्यांच्या अर्थाजर्नावर होत असलेल्या परिणामांसाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना नमूद करण्यात आल्या आहेत.
बॉम्बे61 स्टुडिओ (बी61) हा नाविन्यपूर्ण, प्रयोगशील शहरी उपाययोजनांचा थिंक टँक असून त्यांनी मुंबईकर तरुणांच्या सामाजिक आणि सर्जनशील ताकदीचे प्रतिनिधीत्व करणारे मिनिस्ट्री ऑफ मुंबई मॅजिक (एमएमएम) तसेच संशोधन क्षेत्रातील टॅपेस्ट्री प्रकल्पाच्या सहकार्याने कोळी समाजासाठी ही उपाययोजना तयार केली आहे. शहरातील किनारपट्टी यंत्रणेचे संरक्षण करण्याच्या बाबतीत कोळी समाज पारंपारिकदृष्ट्या पुढे असतो.
मासेमारीच्या पारंपरिक पद्धतीनुसार तयार करण्यात आलेल्या कचऱ्याच्या फिल्टरिंग सुविधेला ‘‘राजा दर्याचा, संरक्षक खाडीचा’’ असे नाव देण्यात आले असून यावर्षीच्या जून महिन्यात वर्सोवा- मालाड खाडीमध्ये ते पहिल्यांदा बसवण्यात आले आहे. ही सुविधा मुंबईला अतिशय गरजेची असलेली दीर्घकालीन आणि किफायतशीर सुविधा ठरू शकते. या स्थानिक पद्धतीच्या सुविधेमध्ये खाडीत टाकण्यात आलेला कचरा पकडला जातो आणि किनारपट्टी भागातील समृद्ध जलविश्वासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या खाडी सुरक्षित राहातात. मच्छीमार समाजाचे पारंपरिक ज्ञान वापरून ही सुविधा तयार करण्यात आली आहे.
या सोप्या उपाययोजनेमुळे केवळ तीन दिवसात खाडीच्या फक्त एका आउटलेटमधून (कवट्या खाडी) ५०० किलो कचरा निघाला असून एका महिन्यात अंदाजे ५००० किलो कचरा या प्रदूषित आउटलेटमधून दूर केला जाऊ शकतो. संपूर्ण मालाड खाडीमध्ये अंदाजे २४,१५० किलो कचरा अडकलेला असू शकतो आणि आणि खाडीच्या वेगवेगळ्या आउटलेट्समध्ये हे नेट फिल्टर्स बसवल्यास तो सहजपणे काढता येईल.
मुंबईची कचऱ्याची समस्या आता जगजाहीर आहे. बॉम्बे कम्युनिटी पब्लिक ट्रस्टच्या संकेतस्थळावर (bcpt.org.in) प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार मुंबईमध्ये दर दिवशी अंदाजे ७०२५ टन कचऱ्याची निर्मिती होते. २०१९ मध्ये आलेल्या एका बातमीनुसार सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या (सीपीसीबी) मते मुंबईत प्रत्येक दिवशी ११,००० टन घनकचरा निर्मिती होते, जी संपूर्ण महाराष्ट्रातल्या कचरा निर्मितीच्या एक तृतीयांश आहे. यावरून शहरातील लँडफिल्स अतिरिक्त मर्यादेपर्यंत का वापरले गेले आहेत आणि कशामुळे हा कचरा खाडीमध्ये अडकून स्थानिक समाजाचे अर्थार्जन आणि नद्या धोक्यात आणत आहे याचे स्पष्टीकरण मिळते.
एमसीजीएम एकंदरीत शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर देखरेख करत असून विशिष्ट समाजाच्या पारंपरिक पद्धतीवर आधारित असलेल्या या इन्स्टॉलेशनमुळे त्यांचे कचरा व्यवस्थापनाचे ध्येय पूर्ण करण्यास मदत होईल.
हा अहवाल आणि या उपाययोजनेद्वारे आपल्या खाड्या, नद्या, ओढे किती समृद्ध आहेत हे अधोरेखित करण्याचा आमचा प्रयत्न असून त्याचबरोबर आपला स्थानिक समाज कशाप्रकारे त्यावर अवलंबून आहे आणि पाण्याचे हेच प्रवाह आता शहरातील कचरा मिसळल्यामुळे नाले आणि गटारे म्हणून ओळखले जात आहेत हे आम्हाला सांगायचे आहे. ‘‘राजा दर्याचा, संरक्षक खाडीचा’’ द्वारे मच्छीमार समाजाचे आयुष्य व त्यांच्या अर्थाजनाचा खालावत असलेला दर्जा, खारफुटीचा कमी होत चाललेला थर, एकंदर समुद्री व्यवस्थेला पोहोचत असलेला धोका आणि त्याचा धोका संभवणाऱ्या समाजाला शहराचा हवामान कृती राखडा व धोरणामध्ये समाविष्ट करण्याची निर्माण झालेली गरज याकडे लक्ष वेधणार आहोत.
वर्सोवा कोळीवाड्यातील मच्छीमारांचे गटप्रमुख विष्णू हेगडे म्हणाले, ‘गेल्या दोन दशकांपासून खाडीत तरंगणाऱ्या घनकचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी आम्ही खाडीत मासे पकडण्यासाठी जाळी लावायचो आणि मग विचार केला, की कचरा गोळा करण्यासाठी तेच तंत्र का वापरू नये. आम्ही त्याच्या तांत्रिक डिझाइनवर तपशीलवार चर्चा केली आणि त्यातून तयार झालेल्या जाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा गोळा झाला. जर सरकारने आमच्या प्रयत्नांची दखल घेऊन त्याला पाठिंबा दिला, तर नक्कीच पाणी यंत्रणेतील कचरा कमी करण्यासाठी व आमची रोजीरोटी जपण्यासाठी मदत होईल.’
मिनिस्ट्री ऑफ मुंबई मॅजिकचे हरप्रीत भुल्लर म्हणाले, ‘मासे पकडण्याच्या जाळ्या बसवताना शहरातील पारंपरिक मच्छीमार समाज म्हणजे कोळी बांधवांची मदत घेण्यात आली असून त्यातून मुंबईच्या खाड्यांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी स्थानिक उपायाची निर्मिती झाली आहे. या नाविन्यपूर्ण प्रयोगातून आम्ही शहरी शाश्वतता जपताना आणि शहरातील राहाणीमानाची धोरणे आखताना संबंधित समाजाचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित करत आहोत. आम्ही मुंबईच्या तरुणांना त्यांनी एकत्र येऊन हा नाविन्यपूर्ण प्रकल्पास अधिक व्यापक स्तरावर राबवण्यास मदत करावी असे आवाहन करत आहोत. त्यांच्या मदतीने नागरी प्रशासनासह इतरत्र राबवून त्याचा प्रभाव आणखी वाढवता येईल.’
बॉम्बे 61 स्टुडिओचे जय आणि केतकी भडगावकर म्हणाले, ‘शहरातील पर्यावरणाचा खालावत असलेला दर्जा आपल्या इतक्या परिचयाचा झाला आहे, की आपण इथल्या जल प्रवाहांना नाले म्हणायला लागलो आहोत. एकेकाळी पूर्ण क्षमतेसह वाहाणारे हे प्रवाह चांगल्या पर्यावरणाचे द्योतक होते आणि त्याच्या अनुषंगाने कोळी समाजाचा विकास झाला. मात्र, आता या प्रवाहांचे रुपांतर शहराचा निष्काळजीपणा व प्रदुषणामुळे गटारात झाले आहे. या इन्स्टॉलेशनमधून ३ दिवसांत ५०० किलो कचरा गोळा झाला असून तो आता पुढील प्रक्रिया व रिसायकलिंगसाठी पाठवला जाईल. हा प्रायोगिक प्रकल्प नैसर्गिक पद्धतींचा वापर करणारा असल्यामुळे जलप्रवाहाच्या प्रकारानुसार तो कुठेही वापरता येईल तसेच त्याची व्याप्ती वाढवता येईल. या सोप्या उपाययोजनेमध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे.’