मुंबई : स्वातंत्र्यसेनानी, मुंबईचे माजी महापौर, ज्येष्ठ कामगार नेते स्व. डॉ. ,शांती पटेल यांचा ८ ऑगस्ट २०२२ रोजी जन्मशताब्दी सोहळा आहे. सकाळी ११ वाजता ऑरेंज गेट प्रिन्सेस गोदी जवळ असणाऱ्या चौकाला मान्यवरांच्या हस्ते डॉ. शांती पटेल यांचे नाव देण्याचा कार्यक्रम होणार असून, दुपारी अडीच वाजता विजयदिप कॉन्फरन्स हॉलमध्ये चार लेबर कोडवर कामगार कायदेतज्ञ व सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲड. संजय सिंघवी यांचे कामगाराना मार्गदर्शन होणार आहे.
डॉ. शांती पटेल यांनी विद्यार्थी दशेत असतानाच महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला.गोदी कामगार चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे, हे गोदी कामगार कधीच विसरू शकत नाही. मुंबई पोर्ट ट्रस्टचे ते ६२ वर्षे विश्वस्त होते. पोर्ट उद्योगातील हा एक जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. डॉ. शांती पटेल यांच्याजवळ देशहित, उद्योगहित व कामगारहीत याबाबत चांगला दूर दृष्टिकोन होता. संप कधी करायचा व कधी मागे घ्यायचा हे तंत्र त्यांना चांगले अवगत होते. त्यांचा राजकारणातला अनुभव नेहमीच कामगारांच्या फायद्याचा ठरला. गोदी कामगारांच्या पगारवाढीची ज्या ज्या वेळेस मागणी असायची त्यावेळेस त्यांनी संबंधित मंत्रीमहोदयाना भेटून नेहमीच मार्ग काढला. त्यांच्या अनुभवामुळे व कामगार एकजुटीमुळे गोदी कामगारांना चांगली पगारवाढ व पेन्शनवाढ मिळाली, हे गोदी कामगार कधीच विसरू शकत नाही.
८ ऑगस्ट २०२२ रोजी डॉ. शांती पटेल यांची जन्मशताब्दी आहे, त्यानिमित्त युनियनच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद व तमाम गोदी कामगारांतर्फे विनम्र अभिवादन.