मुंबई : बॉलिवूडची गायिका सुनिधी चौहान ही लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. सुनिधी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सुनिधीचे लाखो चाहते आहेत. सुनिधीच्या शोला आपल्याला नेहमीच चाहत्यांची गर्दी असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, यावेळी सुनिधी तिच्या शोमुळे किंवा आगामी गाण्यामुळे नाही तर एका दुसऱ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सुनिधी विरोधात शिवसेनेचे काही कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झालेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुनिधी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. सुनिधीचा आगामी लाईव्ह कार्यक्रम होणार असून त्याचे स्पॉन्सर पाकिस्तानी असल्याचा आरोप शिवसेनेच्या वाहतूक शाखेने केला आहे.
सुनिधीचा हा आगामी कार्यक्रम पाकिस्तान स्पॉन्सर असून तो होऊ नये, यासाठी त्यांनी तक्रार दाखल केली असून शिवसेनेचा ठाम विरोध असणार आहे असे शिव वाहतूक सेना कार्यकारी प्रमुख गफ्फार शेख यांनी म्हटले आहे. याविषयी बोलताना शेख म्हणाले, सुनिधीनं पाकिस्तानद्वारा स्पॉन्सर कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याला आमचा विरोध आहे. कारण पाकिस्तान एक असा देश आहे. जो कायम भारत विरोधी आहे. जेवढ्या या ठिकाणी दंगली झाल्या, जेवढे बॉम्बस्फोट झाले या सगळ्यात पाकिस्तानचा हात होता. सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे आपल्या देशाच्या बॉर्डवर जे जवान लढतात त्यातील काही जवान काही काळापूर्वी शहीद झाले. असं सगळं असताना सुनिधी पाकिस्तानकडून स्पॉन्सरशिप घेऊन भारतात शो करते असं म्हणतं त्यांनी कार्यक्रमाचे पॅम्प्लेटही दाखवले. सुनिधीचा हा शो 13 ऑगस्ट शनिवारी दुबईत होणार आहे.