मुंबई : अडकलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला. उद्या सकाळी 11 वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यात एकनाथ शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय शिरसाट, दादा भुसे, संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. त्यात 15-35 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. याचबरोबरच 10 ऑगस्टपासून विधीमंडळाचे अधिवेशन असल्याने सचिवालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची उद्याची मोहर्रमची सुटी रद्द करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे गट
1) गुलाबराव पाटील 2) उदय सामंत 3) संजय शिरसाट 4) दादा भुसे 5) संदीपान भुमरे
भाजपचे संभाव्य मंत्री
1) चंद्रकांत पाटील 2) सुधीर मुनगंटीवार 3) राधाकृष्ण विखे – पाटील 4) गिरीश महाजन
मंत्रिमंडळ विस्ताराचे चित्र उद्या स्पष्ट होईल – मुख्यमंत्री
मंत्रिमंडळ विस्ताराचे चित्र उद्या स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते नांदेडमध्ये आले असता बोलत होते. शिंदे हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिंदे यांचे आज नांदेड येथील श्री गुरू गोविंदसिंहजी विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर काहीही ठोस उत्तर दिले नाही. मात्र, मंत्रिमंडळात नक्की कोणती नावे असतील..? कुणाला संधी मिळेल..? याबाबत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उद्या मिळतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, ज्येष्ठ आमदार आशिष शेलार आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना भाजपच्या कोट्यातून मंत्री बनवण्याची चर्चा सुरू आहे. मात्र या नेत्यांना सायंकाळी उशिरापर्यंत शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण मिळाले नाही.
मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. त्यापैकी 16 जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. भाजपने आपले एक आमदार राहुल नार्वेकर यांची यापूर्वीच विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक डोक्यावर असल्याने भाजप मुंबईबाबत अत्यंत सावध दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पर्याय समजले जाणारे आमदार आशिष शेलार यांना मंत्री करून पक्ष त्यांचा वजन वाढवू शकतो. या प्रकाराची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांना मंत्री केल्यास त्यांच्या जागी शेलार यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिले जाण्याची शक्यता आहे.
मुंबै बँकेचे अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याचे निमंत्रण मिळाले नव्हते. मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांचा हिंदी भाषक कोट्यातून मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील गुजराती भाषकांची संख्या पाहता यावेळी चारकोप विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश सागर, मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा आणि घाटकोपर (पूर्व) मतदारसंघाचे आमदार पराग शहा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.
ओबीसी कोट्यात संधी
ओबीसी कोट्यातील दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मनीषा चौधरी मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग करताना दिसत आहेत. चौधरी हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
शिंदे गटात शांतता
उद्धव ठाकरेंविरोधात बंड करत आमदार प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर, दिलीप लांडे, यामिनी जाधव आणि मंगेश कुडाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. शिंदे गटातील या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची किंवा महामंडळात अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत यापैकी कोणालाही मंत्रिपदाचे निमंत्रण मिळाले नव्हते
कार्यालयीन आदेश जारी
विधीमंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चालु आणि नियोजीत रजाही नऊ ते अठरा ऑगस्ट या कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात कार्यालयीन आदेशच काढण्यात आले आहेत.