अगदी मोजक्याच नातेवाईक, मित्रपरिवारासोबत सोनाली-कुणालचा लग्नसमारंभ पार पडला होता. मात्र त्याचे फोटो, व्हिडीओ कुठेच झळकले नव्हते. त्यामुळे सोनालीचं लग्न कसं झालं, हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. आता चाहत्यांना सोनाली आणि कुणालच्या आयुष्यातील या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे. एखाद्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. येत्या 11 ऑगस्ट रोजी झळकणारा हा लग्नसोहळा काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
याविषयी सोनाली कुलकर्णी म्हणते, “आपलं लग्न धुमधडाक्यात व्हावं, हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. माझंही होतं. परंतु कोरोना महामारीमुळे आम्ही रजिस्टर लग्न केलं. त्यामुळे आमच्या लग्नात माझ्या माहेरच्या- सासरच्या कोणालाच सहभागी होता आलं नाही. त्यामुळेच सर्व काही आलबेल झाल्यानंतर आम्ही आमच्या जवळच्या लोकांसोबत अगदी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर आधुनिक पद्धतीने रिसेप्शनही केलं. खरंतर कलाकार हे नेहमीच आपल्या अनेक वैयक्तिक गोष्टी या खासगी ठेवतात, मात्र मला माझा आयुष्यतील आनंदाचा क्षण माझ्या चाहत्यांसोबत शेअर करायचा आहे, म्हणूनच मी या सोहळ्याचं प्रसारण करण्याचं ठरवलं आणि यासाठी प्लॅनेट मराठीसारखं उत्तम ओटीटी मला मिळालं, ज्यामुळे माझा लग्नसोहळा जगभरातील मराठी प्रेक्षक पाहू शकतील.”
काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांना या लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रणही दिलं होतं. आता या लग्नसोहळ्याची झलकही चाहत्यांच्या भेटीला आली असून कधी हा सोहळा ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर पाहता येईल, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.
प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “सातासमुद्रापार लंडनसारख्या देशात सोनाली कुलकर्णी व कुणाल बेनोडेकर यांचं लग्न पार पडलं होतं. प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या कलाकाराच्या लग्नातील धमालमस्ती अनुभवायची असते. सोनालीचा चाहतावर्ग पाहता आम्ही तिचा संपूर्ण लग्नसोहळा ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. नुकतंच तिच्या या सोहळ्याचं ट्रेलर झळकलं असून ते प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारं आहे. लवकरच चाहत्यांना ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर लग्नाला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे.”