मुंबई : शेअर बाजारातील बिगबुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचा पाठिंबा असलेली आकासा एअर आता उड्डाणासाठी सज्ज आहे.
अकासा एअर पुढील महिन्यात ७ ऑगस्टपासून व्यावसायिक विमानसेवा सुरू करणार आहे. कंपनीचे पहिले विमान मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर उड्डाण करणार आहे.
मुंबई-अहमदाबाद मार्गावर उड्डाण करण्यासाठी अकासा एअर बोईंगच्या ७३७ मॅक्स विमानाचा वापर करणार आहे. मुंबई-अहमदाबाद विमानाच्या तिकिटांची विक्री 28 जुलैपासून सुरू होणार असल्याचे अकासा एअरने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
‘नव्या बोईंग ७३७ मॅक्स विमानाद्वारे मुंबई आणि अहमदाबाद मार्गावर आम्ही आमची सेवा सुरू करणार आहोत. आमच्या नेटवर्क विस्ताराच्या योजनांना पाठिंबा देण्यासाठी आणि देशातील अधिकाधिक शहरे जोडण्यासाठी आम्ही टप्प्याटप्प्याने दृष्टीकोन अवलंबू. पहिल्या वर्षी आम्ही आमच्या ताफ्यात दर महिन्याला दोन विमानांची भर घालू.” असे अकासा एअर’चे सहसंस्थापक आणि मुख्य वाणिज्य अधिकारी प्रवीण अय्यर यांनी म्हटले आहे.
मुंबई-अहमदाबाद मार्गावर ७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या २८ साप्ताहिक उड्डाणांसाठी आणि १३ ऑगस्टपासून बंगळुरू-कोची मार्गावर २८ साप्ताहिक उड्डाणांसाठी तिकीट बुकिंग सुरू झाले आहे.
अकासा एअर बोईंग ७३७ मॅक्स विमानाच्या दोन विमानांनी व्यावसायिक सेवा सुरू करणार आहे. बोईंगने एक विमान अकासा एअरला दिले आहे, तर दुसर् याची डिलिव्हरी या महिन्याच्या शेवटी दिली जाईल. असे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अकासा एअर बोईंगकडून 72 मॅक्स विमान खरेदी करणार
अकासा एअरने या महिन्यात ७ जुलै रोजी हवाई वाहतूक नियामक डीजीसीएकडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र मिळवले होते. ऑगस्ट 2021 मध्ये डीजीसीएने मॅक्स विमानांना हिरवा झेंडा दाखवल्यानंतरच आकासा एअरने 26 नोव्हेंबर 2021 रोजी बोईंगसोबत 72 मॅक्स विमाने खरेदी करण्याचा करार केला होता.