मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचे यंदाचे हे 39 वे वर्ष आहे. येत्या 13 ऑगस्ट 2022 ला पत्रकार संघाच्या सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल.
गेली पाच दशके पत्रकारितेत सक्रीय असणाऱ्या प्रकाश कुलकर्णी यांनी विविध वर्तमानपत्रात अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. दै. लोकसत्ताचे मुंबईतील ते पहिले निवासी संपादक होते. दै. नवशक्तीचे संपादकपदही त्यांनी भूषविले. दै. वृत्तमानसचे संपादक असताना आपल्या कल्पकतेने पत्रकारितेत त्यांनी केलेला नवा प्रयोग चांगलाच गाजला.
ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण येत्या 13 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात येईल, अशी माहिती संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी दिली.