MUMBAI : शालेय क्रीडा चळवळीला प्रोत्साहन देणारे आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १५ वर्षाखालील इयत्ता नववीपर्यंतच्या शालेय मुलामुलींसाठी विनाशुल्क बुध्दिबळ स्पर्धा १९ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे ही स्पर्धा परेल येथील आरएमएमएस सभागृहात होईल. विजेत्या-उपविजेत्या २४ स्पर्धकांना पुरस्कारासह गौरविण्यात येणार असल्याची माहिती आरएमएमएसचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी दिली.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांच्या प्रोत्साहनामुळे मुंबईमधील विशेषतः कामगार विभागातील शाळांच्या मुलामुलींना कबड्डी, कॅरम, बुध्दिबळ आदी खेळांचे तज्ञ मार्गदर्शकांमार्फत मोफत प्रशिक्षणासह स्पर्धात्मक सामन्यांचे आयोजन प्रतिवर्षी होत असते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत प्रवेशाची माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर चषक शालेय बुध्दिबळ स्पर्धा होणार असून संयोजकांतर्फे स्पर्धेसाठी बुध्दिबळ साहित्य मोफत पुरविले जाईल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित शालेय मुलामुलींनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा क्रीडाशिक्षक अविनाश महाडिक (९००४७ ५४५०७) यांच्याकडे १४ मार्चपर्यंत संपर्क साधावा.