NHI NEWS : ANAGHA
मुंबई, : पहिल्यावहिल्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये (आयएसपीएल) नालासोपार्याचा डावखुरा फलंदाज सुमीत ढेकळे याची चेन्नई सिंगम्स संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
राजदीपकुमार गुप्ता, संदीपकुमार गुप्ता आणि अभिनेता सूर्या शिवकुमार यांच्या सह-मालकीच्या चेन्नई सिंगम्स संघाने क्रिकेटपटूंच्या लिलावात सुमीत याला 19 लाख रुपयांची बोली लावली. चेन्नई सिंगम्स संघातील सर्वात महागडा खेळाडू आहे.
’बाहुबली’ या टोपणनावाने ओळखल्या जाणार्या सुमीत ढेकळेने टेनिस क्रिकेट विश्वात त्याचा आगळावेगळा ठसा उमटवला आहे. 35 वर्षीय सुमीतला टेनिस क्रिकेटचा दोन दशकांचा अनुभव आहे. मूळचा मुंबईजवळील नालासोपारा येथील या क्रिकेटरने पारंपारिक लेदर बॉल ते टेनिस बॉल क्रिकेट असा यशस्वी प्रवास केला. एनएसपी संघात सामील झाल्यानंतर विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. बीए ग्रॅज्युएट असूनही सुमीतचा कायम क्रिकेटकडे ओढा राहिला. तो त्याच्या यशाचे श्रेय वडील वरद ढेकळे यांना देतो. ते एक क्रिकेटप्रेमी असून ढेकळे कुटुंबाची खेळाविषयीची आवड जोपासण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
आयएसपीएलमध्ये चेन्नई सिंगम्सच्या उपकर्णधारपदी संजय कनोजियाची निवड झाली आहे. या फ्रँचायझीने लिलावामध्ये 96.4 लाखांमध्ये 16 खेळाडू करारबद्ध केले. कर्णधार सुमीत आणि संजय याच्यासह चेन्नई सिंगम्सकडे दिलीप बिंजवा, सागर अली, फरहत अहमद, फरमान खान, आर थाविथ कुमार, व्यंकटाचलपती विघ्नेश, अनिकेत सानप, बबलू पाटील, हरीश परमार, केतन म्हात्रे, राजदीप जडेजा, वेदांत मयेकर, विश्वनाथ जाधव, आणि पंकज पटेल अशा सर्वोत्तम खेळाडूंचा भरणा आहे.
आयएसपीएलचा पहिलावहिला हंगाम आणि लिलाव प्रक्रियेबाबाबत चेन्नई सिंगम्सचे सह-मालक राजदीप गुप्ता म्हणाले की, आयएसपीएलमधील सहभाग हा चेन्नई सिंगम्स कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे. व्यावसायिक टेनिस स्पर्धांमध्ये वाढणारी आवड आणि टेनिस क्रिकेटमधील लक्षणीय सहभाग यामुळे सुमीतकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वोत्तम खेळ, कुशल बुद्धिमत्ता आणि खेळातील मोठ्या अनुभवाच्या जोरावर तो चेन्नई सिंगम्स संघाला नव्या उंचीवर नेईल.
चेन्नई सिंगम्सचा कर्णधार सुमीत ढेकळे म्हणाला की, चेन्नई सिंगम्स संघाचे नेतृत्व करणे हा माझा मोठा सन्मान समाजतो. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सारख्या लीगमुळे अनेक प्रतिभावंत आणि युवा खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळाले आहे. या लीगच्या माध्यमातून खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी आहे. आमची सराव सत्रे आणि कसून सराव पाहता प्रत्येक सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. याशिवाय पदार्पणात आम्ही आयएसपीएलचे जेतेपद पटकावू, अशी मला 100 टक्के खात्री आहे.
आयएसपीएल अर्थात इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचा पहिला हंगाम 6 ते 15 मार्च 2024 दरम्यान दादोजी कोंडदेव स्टेडियम, ठाणे येथे खेळवला जाणार आहे.