मुंबई; NHI NEWS : आयडील स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित संस्थेचे क्रीडा सल्लागार व श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालयाचा मंदार पालकर, सेस मायकल हायस्कूलचा निखील भोसले, डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूलचा ध्रुव भालेराव आदींनी सलामीचे सामने जिंकले. सत्कारमूर्ती नरेंद्र राणे यांनी नाणेफेकीचा कौल देत सुरु झालेल्या सामन्यामध्ये सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखल्यामुळे मंदार पालकरने मायकल हायस्कूलच्या अब्दुल इझानला २५-० असा नील गेम दिला आणि दुसरी फेरी गाठली.
दुसऱ्या सामन्यात निखील भोसलेने सुरुवातीपासून आघाडी घेत पुष्कर गोळेवर दबावाचे सातत्य कायम ठेवले. परिणामी निखील भोसलेने १३-१० असा विजय मिळवीत पहिली फेरी जिंकली. अन्य सामन्यात ध्रुव भालेरावने उमर पठाणचा २२-० असा, सार्थक केरकरने शेख आयनचा २१-५ असा, सिध्दांत मोरेने गंधर्व नारायणकरचा १२-१० असा, सुयश कडवेकरने रश्मी सिंगचा १३-२ असा तर समीर खानने साची गोरुळेचा २०-१० असा पराभव करून विजयीदौड केली. उद्घाटन प्रसंगी नारायण गुरु कॉमर्स कॉलेजच्या स्पोर्ट्स डायरेक्टर पूनम मुजावर, क्रीडाशिक्षक अविनाश महाडिक, प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळी उपस्थित होती. स्पर्धेला राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सहकार्य लाभले होते.
************************************************