मुंबई : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत लात्वियाच्या दरजा सेमेनिस्तेजा, ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म हंटर, यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात लात्वियाच्या सहाव्या मानांकित दरजा सेमेनिस्तेजा हीने नेदरलँडच्या एरियन हार्टोनोचा ७-५, ६-४ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केला. बरोबरीत सामना सुरू असताना दरजाने एरियनची अकराव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट ७-५ असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये देखील दरजाने आपला रंगतदार खेळ सुरू ठेवला. पहिल्याच गेममध्ये तिने एरियनची सर्व्हिस ब्रेक केली. त्यानंतर दरजा ने आपली आघाडी कायम ठेवत हा सेट ६-४ असा जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. २१ वर्षीय दरजा हीने मागील महिन्यात बेंगळुरू येथील आयटीएफ स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म हंटर हीने अमेरिकेच्या आठव्या मानांकित कॅटी वॉलनेट्सचा टायब्रेकमध्ये ६-४, ७-६(४) असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दोन्ही खेळाडू प्रथमच प्रतिष्ठीत अशा डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेची रविवारी अंतिम फेरी खेळणार आहेत.
निकाल: एकेरी: उपांत्य फेरी:
स्टॉर्म हंटर(ऑस्ट्रेलिया) वि.वि.कॅटी वॉलनेट्स(अमेरिका)(८)६-४, ७-६(४);
दरजा सेमेनिस्तेजा(लात्विया)(६)वि.वि.एरियन हार्टोनो(नेदरलँड)७-५, ६-४