पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच झळकले असतानाच आता या चित्रपटातील मनाला भिडणारे असे गाणे प्रदर्शित झाले आहे. जगण्याला नवे पंख देऊन पुन्हा भरारी घ्यायला लावणाऱ्या या फ्रेश गाण्याचे ‘मन बेभान’ असे बोल असून या सुंदर गाण्याला सुहित अभ्यंकर यांचा आवाज आणि श्रवणीय संगीत लाभले आहे. तर मनाला स्पर्श करणाऱ्या या गाण्याचे बोल मंदार चोळकर यांनी लिहिले आहेत. हे गाणे पूजा सावंत आणि चेतन मोहतुरे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.
या गाण्याबद्दल गायक सुहित अभ्यंकर म्हणतात, ” या गाण्याचे बोल अतिशय हृदयस्पर्शी आहेत. कधी कधी आयुष्यात आलेली मरगळ दूर करण्यासाठी हे गाणे नक्कीच स्फूर्तिदायी ठरेल. आयुष्याचा अर्थ सांगणारे, स्वप्नांचा मागोवा घेणारे हे गाणे आहे. त्यामुळे या गाण्याचे संगीत तसेच उत्साहाने भरलेले असणे आवश्यक होते आणि मला आनंद आहे की, अपेक्षित असे संगीत मला या गाण्यासाठी देता आले. हे गाणे ऐकायला जितके छान वाटते, तितकेच त्याचे सादरीकरणही उत्कृष्ट आहे.”
दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, ” कोणत्याही चित्रपटातील गाणे हे त्याचा आत्मा असतो. संगीतातून अनेक भावना व्यक्त केल्या जातात. सोडूनी कालचे आज जगताना, तू नवा रंग दे आज स्वप्नांना, जीवनाला उद्देशून असणारे हे गाणे बरंच काही सांगत आहे.”