मुंबई, NHI: को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त सुरु झालेल्या आंतर सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या बुध्दिबळ स्पर्धेत म्युनिसिपल बँकेचा मानस सावंत व इन्कमटॅक्स को-ऑपरेटीव्ह बँकेचा साईराज घाडीगावकर यांनी निर्णायक फेरीत प्रवेश केला. मानस सावंतने एनकेजीएसबी बँकेच्या विनोद मोरेच्या राजाला २७ व्या चालीत नमवून विजय संपादन केला. को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांनी गतविजेत्या सचिन काटकरविरुध्द सलामीची चाल रचून स्पर्धेचे उद्घाटन केले. सहकारी बँकेतील नामवंत २० स्पर्धकांच्या सहभागाची स्पर्धा महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटीव्ह बँकेने पुरस्कृत केली आहे.
दादर-पश्चिम येथील को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या सभागृहामधील दुसरी लढत देखील चुरशीची झाली. साईराज घाडीगावकरने म्युनिसिपल बँकेच्या दीप शिलींगकरच्या वजिराचे हल्ले यशस्वीपणे परतविले. दहाव्या चालीला दोघांनी कॅसलिंग करून आपले राजे सुरक्षित केले. मात्र १३ व्या चालीला दीपने घोडचूक केल्यामुळे साईराजने त्याचा पुरेपूर लाभ उठवित उंट, घोडा व वजिर यांच्या आक्रमक चाली रचल्या. परिणामी २० व्या चालीला साईराजने दीपच्या राजाला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. याप्रसंगी माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, युनियनचे कार्याध्यक्ष सुनिल साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, ठाणे युनियनचे सरचिटणीस प्रदिप पाटील, सहखजिनदार जनार्दन मोरे, अन्य पदाधिकारी भार्गव धारगळकर, अमूल प्रभू, प्रकाश वाघमारे, समीर तुळसकर, अशोक नवले, प्रविण शिंदे, अमरेष ठाकूर, धर्मराज मुंढे आदी मंडळी उपस्थित होती.