f
मुंबई/ भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. पोलिस स्टेशन बाहेर आपल्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आल्याचं गायकवाड यांनी म्हटलं होतं. मात्र अशातच पोलिस स्टेशन बाहेरील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. धक्काबुक्की कोणी केली याचा खुलासा या व्हिडीओमधून झाल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगितले जात आहे.
दुसऱ्या CCTVचे फुटेज आले समोर, पाहा, VIDEO
चौकीबाहेरच्या CCTVफुटेजमघ्ये काय?
हिल लाईन पोलिस स्थानकाच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड आणि त्याचे सहकारी धक्काबुक्की करत कुणाशी तरी वाद घालत असल्याचे दिसत आहे. वैभव गायकवाड सह इतर सहकारी वाद घालत असून पोलिस मध्यस्थी करत असल्याचंही सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. जेव्हा आमदार गणपत गायकवाड यांनी आतमध्ये गोळीबार केला तेव्हा महेश गायकवाड यांना वाचवण्यासाठी गेलेल्या सुरक्षारक्षकाला आमदार गायकवाड यांच्या भाच्याने खेचून मारहाण केल्याचेही सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
कसा झाला होता गोळीबार; VIDEO
आमदार म्हणाले, आत्मसंरक्षणासाठी गोळीबार
गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यावर आपली प्रतिक्रिया देताना, माझ्या मुलाला पोलीस स्टेशनमधून बाहेर जाताना धक्कबुक्की केली गेली. महेश गायकवाड याने पोलीस स्टेशन बाहेर चारशे जणांना जमा केलं होतं. माझ्या मुलांना पोलिस ठाण्यात पोलिसांसमोर मारत असतील तर मग मी काय करणार? माझं आत्मसंरक्षण करण्यासाठी मला हे करणं गरजेचं असल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगितलं होतं.
आमदारावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
उल्हासनगर-हिल लाईन पोलिस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने आमदारांसह इतर 7 जणांवर गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे गणपत गायकवाड यांच्या अडचणीच वाढ झाली आहे. गोळीबार प्रकरणी गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
क्राईम ब्रँचने भाजप पदाधिकाऱ्याला घेतलं ताब्यात
आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी कल्याण क्राईम ब्रँचने भाजप पदाधिकाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. निलेश बोबडे असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. निलेश बोबडे हे भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष आणि उल्हासनगर आयुष्यमान योजना अध्यक्ष पदावर काम करत असल्याची कार्यकर्त्यांची माहिती आहे. निलेश बोबडे हे गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या आरोपींच्या संपर्कात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे. त्यामुळे क्राईम ब्रांचने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या चौकशीनंतर निलेश बोबडे यांचा काय रोल आहे हे येणार समोर आहे.
घोषणाबाजी करणाऱ्या 11 जणांवर गुन्हा दाखल
गणपत गायकवाड यांना धक्का देणारी दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपत गायकवाड यांना उल्हासनगर कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोर्टाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली होती. कार्यकर्त्यांना हीच घोषणाबाजी करणं महागात पडलं आहे. याप्रकरणी 11 जणांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.