Mumbai -NHI
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती आंतर शालेय सुपर लीग विनाशुल्क कबड्डी स्पर्धेच्या दक्षिण मुंबई विभागातून मुक्तांगण हायस्कूल-करीरोड, अँटोनियो डिसोझा हायस्कूल-भायखळा संघांनी विजयीदौड केली. विजयाचे पारडे दोलायमान झालेल्या सामन्यात मुक्तांगण हायस्कूलने उमरखाडीच्या सेंट जोसेफ हायस्कूलचा ६७-६५ असा तर डिसोझा हायस्कूलने माझगावच्या सर एली कदुरी हायस्कूलचा ४०-३५ असा पराभव केला. अष्टपैलू परमेश पाटील व आदित्य शेरकर यांना सामनावीर पुरस्कार देऊन बॉम्बे डाइंग सेक्युरिटीचे सहाय्यक महाव्यवस्थापक शांताराम सुखठणकर, सेक्युअर वन सेक्युरिटी सर्व्हिसेसचे अधिकारी ऑगस्टीन फर्नांडीस, कबड्डी प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी गौरविले.
आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित दक्षिण विभाग शालेय कबड्डी स्पर्धेमधील सेंट जोसेफ हायस्कूल विरुध्द मुक्तांगण हायस्कूल यामधील लढत उत्कंठावर्धक झाली. पहिल्या डावात साई पुगावकरच्या खोलवर चढायांमुळे जोसेफ हायस्कूलने ३२-३० अशी मध्यंतराला आघाडी घेतली. परंतु उत्तरार्धात परमेश पाटीलचा अष्टपैलू खेळ व आर्यन फराकटेच्या चढाया, यामुळे मुक्तांगण हायस्कूलने ६७-६५ अशी बाजी मारली. अष्टपैलू आदित्य शेरकर व रचित वागमोडे यांच्या चतुरस्त्र खेळामुळे डिसोझा हायस्कूलने कदुरी हायस्कूलचा ४०-३५ असा चुरशीचा पराभव केला. पराभूत संघाचा समीर खान चमकला. मुंबई विभागीय प्राथमिक फेरीत चुटपूट लागणाऱ्या पराभवामुळे विभागवार द्वितीय स्थानवर गेलेल्या संघांना मुख्य फेरीत प्रवेश देण्याचे संयोजन समिती प्रमुख अश्विनीकुमार मोरे व गोविंदराव मोहिते यांनी ठरविले आहे. याप्रसंगी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कबड्डीपटू शेखर चव्हाण यांना षष्ठ्यब्दीपुर्तीनिमित्त सुवर्णमुद्रा, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह स्वरूपाचा आयडियल क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
******************************