मुंबई -NHI- प्रतिनिधी: –आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व राष्ट्रीय मिल मजदूर संघतर्फे कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती चषक विनाशुल्क आंतर शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेमधील दक्षिण मुंबई विभाग प्राथमिक फेरीत सर एली कदुरी स्कूल-माझगांव, अँटोनियो डिसोझा हायस्कूल-भायखळा संघांनी सलामीचे सामने जिंकले. सर एली कदुरी स्कूलला विजयासाठी उमरखाडीच्या सेंट जोसेफ हायस्कूलने २-१ असे झुंजविले. प्राथमिक फेरीतील विभागवार उत्कृष्ट संघांमध्ये सुपर लीग कॅरमचे सामने ९ ते ११ डिसेंबर रोजी परेल येथील आरएमएमएस सभागृहात होणार आहेत. स्पर्धात्मक खेळासह शालेय विध्यार्थी-विध्यार्थीनींना कॅरम खेळाचे व नियमांचे मोफत मार्गदर्शन चँम्पियन कॅरम बोर्डावर उपलब्ध करून देण्यासाठी आरएमएमएसचे अध्यक्ष व आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते हे विशेष प्रयत्नशील आहेत.
माझगांव येथील सरेली सभागृहामध्ये मयूर गोरेगावकरने सरळ जाणाऱ्या सोंगट्यांचे सातत्य राखत रोहक हमझाला १३-० असे नमविले आणि सर एली कदुरी स्कूलला सेंट जोसेफ हायस्कूल विरुद्ध १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सांघिक एकेरीत मात्र सेंट जोसेफ हायस्कूलच्या सुशील हंसिकने अफगान शेखला १५-० असे नमवून १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक तिसऱ्या एकेरीत सेंट जोसेफ हायस्कूलच्या मोहमद आफकने पहिला बोर्ड ४ गुणांचा घेत आश्वासक प्रारंभ केला. परंतु त्यानंतर सूर सापडलेल्या याकुब मुल्लाने १५-४ असा विजय मिळवीत सर एली कदुरी स्कूलला २-१ असा विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात अँटोनियो डिसोझा हायस्कूलने सरेली मुलींच्या संघाचा ३-० असा पराभव करतांना मंथन घोडकर, अथर्व देवकर, आदित्य शेरकर यांनी विजयी खेळ केला. मुख्याध्यापक धर्मेद्र वाघ, पर्यवेक्षक मंगेश पांचाळ, क्रीडा शिक्षक सुनील जाधव, क्रीडा शिक्षक प्रॉमिस सैतवडेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. पंचाची कामगिरी क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, सुनील खोपकर, ओमकार चव्हाण करीत आहेत.
*************************************************************************