मुंबई: बेस्ट उपक्रमाने, १ सप्टेंबर २०२१ पासून बरेच बसमार्ग बंद केले होते. प्रवाशांना किमान १५ मिनिटांच्या अंतराने बसगाड्या उपलब्ध व्हाव्या हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी त्यावेळेस सांगितले होते. बस प्रवर्तनाच्या या अचानक केलेल्या बदलामुळे प्रत्यक्षात मात्र प्रवाशांचे अतोनात हाल झाले. बेस्ट प्रशासनाच्या या निर्णयामुळे बसगाड्यांचे अपेक्षित असलेले १५ मिनिटांच्या अंतराने प्रवर्तन सध्याच्या काळात ३० ते ४० मिनिटांवर येऊन ठेपले. या संदर्भात ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ या प्रवासी संघटनेकडे बऱ्याच बस प्रवाशांनी तक्रारी केल्या आहे.
कायमस्वरूपी बंद केलेले बसमार्ग पुन्हा सुरु करावे
यासंदर्भात शुक्रवार २९ जुलै २०२२ रोजी बेस्ट भवन कुलाबा येथे बेस्ट उपक्रमाचे मुख्य वाहतूक अधिकारी रविंद्र शेट्टी यांची ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजित भेट घेतली. बेस्ट उपक्रमाने १ सप्टेंबर २०२१ पासून खंडित, बंद केलेले बसमार्ग पुन्हा पूर्ववत सुरु करण्याबाबत, बसमार्गांचा नव्याने विस्तार करण्याबाबत तसेच प्रवाशांच्या इतर समस्यांवर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा केली. सदर प्रसंगी बेस्ट उपक्रमाचे सहाय्यक वाहतूक अधिकारी सुनिल जाधव, वरिष्ठ वाहतूक अधिकारी प्रशांत मोहरे, संस्थेचे सभासद सिद्धेश कानसे, रुपेश शेलटकर तसेच प्रवासी प्रतिनिधी म्हणून नझीम अन्सारी, विनायक सोनावणे आदी उपस्थित होते