मुंबई : श्रावण सुरु होताच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढू लागली आहे. सोमवारी 740 वाहनांमधून तब्बल 3 हजार 815 टन भाजीपाल्याची आवक झाली असून, त्यामध्ये 5 लाख 87 हजार पालेभाज्यांचा समावेश आहे. आवक वाढल्यानंतरही श्रावण मासामुळे बहुतांश वस्तूंचे दर कडाडले आहेत.
पावसाळा सुरु झाल्यानंतर, जुलैमध्ये भाजीपाल्याची आवक घटली होती. बाजार समितीमध्ये प्रतिदिन सरासरी 500 ते 600 वाहनांमधून 2500 ते 2800 टन कृषी मालाची आवक होत होती. श्रावण सुरु झाल्यापासून तीन दिवसांत आवक वाढली आहे. सोमवारी विक्रमी आवक झाली आहे. राज्यात पावसाने दडी मारली असून, ऊन वाढल्यामुळे 10 ते 15 टक्के भाजीपाला खराब झाला आहे.
महिनाभर राहणार भाजीपाल्याला मागणी
श्रावणामध्ये पुढील एक महिना भाजीपाल्याला मागणी राहणार आहे. बाजारभाव तेजीतच राहण्याची शक्यता व्यापा-यांनी व्यक्त केली आहे. बाजार समिती संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले की, बहुतांश भाजीपाल्याचा पुरवठा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामंधून होत आहे. इतर राज्यातील आवक मर्यादित असल्याचेही सांगितले.