खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवरुन शिंदे गट, भाजप यांच्यावर जोरदार टीका केली. भाजप विघ्नसंतोषी आहे. भाजप अवलादी लक्षणाची पार्टी जिथे जाते तिथे सत्यानाश करते, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केली. भाजप एवढा विघ्नसंतोषी देश आहे, दुहीचे बीज पेरणे ही त्यांची वृत्तीच आहे. भांडण लावून देणे, हा त्यांचा पायंडा आहे. असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून केला. म्हणाले, खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे आहे. मुंबई तोडण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही गाडून टाकू, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर हल्ला केला. तर मोदी, अदानी, घराणेशाही, हिंदुत्व, मराठा आरक्षणासह अनेक मुद्द्यांना हात घालत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे ..
- राज्यकर्त्यांच कर्तव्य असतं, पोट कोणत्याही जातीच असो, ते भरलं गेलच पाहिजे. मी तुम्हांला किंमत देत नाही कारण माझ्यासमोर महाराष्ट्रातील गोरगरीब आहे. जरांगे पाटलांना धन्यवाद यासाठी की जातीपातीच्या भिंती उभ्या करुन आपापसात झुंजवण्याच जे कारस्थान भाजप करतंय त्याला आपल्याला सर्वांना मिळून मोडुन तोडुन टाकायचंय.
- सगळे मराठा, सगळे मराठी… एका मातीची आपण लेकरं. पण ज्याच्याशी आपण लढतोय तो साधासुधा नाही, तो कपटी आहे, विघ्नसंतोषी आहे आणि भाजप इतका विघ्नसंतोषी आहे की कुणाचही लग्न असो, हे येणार, भरपूर जेवणार, सगळ्या पुरणपोळ्या फस्त करणार आणि निघताना नवराबायकोत भांडण लावुन दुसर्या लग्नात जेवायला जाणार, अशी ही अवलाद आहे.
- पुन्हा पुन्हा सांगतोय, भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्याकाळचा जनसंघ असेल, यांचा कोणत्याही लढ्याशी सुतराम संबंध नव्हता. स्वातंत्र्यलढ्याशी संबंध नव्हता, मराठा मुक्ती संग्राम लढ्यामध्ये त्यांच कधी नाव ऐकल नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील ते नव्हते. संयुक्त महाराष्ट्र समितीत ते आले, चळवळीत नव्हते. म्हणून सगळ्यात शेवटी जनसंघ समितीत सामिल झाला, आणि सर्वात आधी बाहेर पडला, जागेवाटपाच भांडण करून! विघ्नसंतोषी म्हणतात ते याला.
- मग जनता पक्षात गेले, तिकडे तोडफोड केली, मग शिवसेनेसोबतत आले, तिकडे अकाली दलाबरोबर गेले, कधी नितीशबरोबर, कधी याच्याबरोबर, कधी त्याच्याबरोबर, गोव्यात मम पक्षाबरोबर… हे अवलादी लक्षणाची पार्टी जिथे जाते तिथे सत्यानाश करते, म्हणून जरांगे पाटलांना सांगतो, पहिले यांच्यापासून सावध रहा.
- भगवा इकडे डौलाने मानाने फडकतो. पण त्यात दुही. पानिपतचा अब्दाली आला होता, त्याने हेच केलं होतं. दुहीची बीज पेरायची, भांडण लावायची आणि मग त्या भांडणांमध्ये खरे प्रश्न जे आहेत, बेकारी असेल. महागाई असेल त्याच्याकडे कुणाचे लक्षा जाता कामा नये. तुमच्या चुली पेटविण्याऐवजी तुमची घरदारं आम्ही पेटवतो आणि मग तुमचे रक्षणकर्ते म्हणून तुमच्या पेटत्या घरांच्या होळीवर आम्ही आमची पोळी भाजते.
- एक वर्ष होऊन गेलं, आपण अपात्रतेच्या केस संदर्भात सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. तारीख वर तारीख. सर्वोच्च न्यायालय कानफाटे फोडतंय परंतु हे निर्लज्जं सदा सुखी. कानफाट फोडलं तरी गाल चोळत सांगतात, आम्ही आमच टाईमटेबल सादर करू, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केली.
- मी कोणाचाही अपमान करू इच्छित नाही, न्यायाधीश न्यायमुर्तींचा तर करूच शकत नाही. पण ज्यापद्धतीने हे सर्व चाललेलं आहे ते पाहुन एक विनोद लक्षात येतो, एकदा भरल्या कोर्टात न्यायमूर्ती बसलेले असतात, आणि केस चालू असतात. कोणाला तारीख दे, कुणाला न्याय दे, कुणाच हिअरिंग घे आणि मग सोबत कोण असतो त्याला विचारतात, ‘पूढची केस कोणती आहे?’ तो सांगतो. एका वीस वर्षाच्या मुलीची छेड काढलेल्याची केस आहे. आता मुलीची छेड काढली म्हंटल तर कोणीही चिडणार. बोलवा त्याला, आणा समोर. आरोपीच्या पिंजर्यात एक आजोबा काठी टेकत येतात. न्यायाधिशांच डोक अजुन फिरतं, तुम्हाला लाज नाही वाटतं, आजोबा झालातं, काठी टेकत चालता आणि वीस वर्षाच्या मुलीची छेड काढता? शरम नाही वाटतं. आजोबा शांतपणे न्यायाधिशाकडे बघतात आणि सांगतात, “न्यायाधिश महाराज, जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सुद्धा वीस वर्षाचा होतो.”
- आता माझं स्पष्ट म्हणणं आहे, ठीक आहे, तुम्ही आम्ही केलेल्या अपात्रतेचा निर्णय लावायचा तेव्हा लावा, वीस वर्षांनी लावा / पन्नास वर्षांनी लावा. आज संपूर्ण देश बघतोय, जग बघतंय, ते केवळ अपात्रतेच्या निर्णयाकडे बघत नाही. तर या आपल्या हिंदुस्थानमध्ये, भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणून जे काही आहे त्याला हा लवाद जुमानत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व राहणार आहे की नाही? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेचे अस्तित्व शिल्लक राहणार आहे की नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अनेक क्रांतिकारकांनी, अनेक योद्ध्यांनी रक्त सांडून, बलिदान देऊन जी आपली भारतमाता स्वतंत्र केली, त्या भारतमातेची लोकशाही टिकणार की नाही? बघुया तीस तारखेला काय होतं? जनतेने ठरवून टाकलं. निवडणूका घेऊन टाका, जनता जनार्दन ठरवेल ते पात्र आहेत की अपात्र!
- सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला नक्की अपेक्षा आहे. भले आपले माननीय पंतप्रधान मोदीजी बोलले घराणेशाही. होय मी घराणेशाहीचा पाईक आहे, कारण मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे, सर्व पूर्वजांचा अभिमान आहे. जो कुटुंबव्यवस्था मानत नाही त्याने दुसर्याच्या घराण्याबद्दल बोलू नये, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
- पहिले कुटुंबव्यवस्था माना आणि मग हिंदुत्वाबद्दल बोला. कारण कुटुंबव्यवस्था हा हिंदुत्वाचा पाया आहे. तोच जर तुम्हांला मान्य नसेल तर तुम्हीं आमच्यावर बोलणारे कोण? तुम्हाला काहीही अधिकार नाही.
आमदार अपात्रतेचा निकाल 50 वर्षांनी लावा, पण…; उद्धव ठाकरेंनी केलं सरकारला आव्हान
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवसैनिक शीवतीर्थावर जमा झाले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित करताना अनेक विषयांवर भाष्य केलं. तसेच शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी आमदार अपात्रता प्रकरणावरही भाष्य केलं. निकाल कधी लावायचो तो लावा, अशी उद्दिग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अपात्रतेचा निर्णय केव्हा लावायचाय तेव्हा लावा, २० वर्षे किंवा ५० वर्षांनंतर लावा. पण, संपूर्ण जग पाहत आहे. केवळ अपात्रतेच्या निर्णयाकडे जग पाहत नाहीये. भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाला हा लवाद जुमानत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व राहणार आहे का नाही? आंबेडकरांच्या संविधानाचं अस्तित्व राहणार आहे का नाही? असा सवाल त्यांनी केला.
हे निर्लज्जम सदा सुखी आहेत. न्यायालयाने त्यांच्या कानफाटात मारली तरी ते गाल चोळत म्हणताहेत की आम्ही टाईमटेबल सादर करु. तारखेवरती तारीख दिली जात आहे. तुम्ही तुमचं टाईमटेबल जेव्हा द्यायचं तेव्हा द्या. एक वर्ष होऊन गेलं आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत, असं ठाकरे म्हणाले.
एकीकडे अडीच लाख वडापाव तर दुसरीकडे घरची भाकर; कथा दोन्ही दसरा मेळाव्याची
शिंदे गटाकडून जेवणाची सोय
आज होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याला येणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांच्या जेवणाची सोय आझाद मैदानावर करण्यात आली आहे. मेळाव्याला येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला पाण्याची बाटली आणि फूड पॅकेट दिलं जात आहे. नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचं जेवण यासाठी पॅकेट्स तयार केले जात आहेत. यासाठी टेंटची देखील सोय करण्यात आली आहे. आझाद मैदानावर दाखल होताना प्रत्येक कार्यकर्त्याला एक वडापावचं पॅकेट आणि पाण्याची बाटली देण्यात येणार आहे. यासाठी जवळपास अडीच लाख वडापाव तयार केले जात आहेत. सकाळ दुपार आणि रात्र या तिन्ही जेवणासाठी वेगवेगळे मेन्यू असण्याची शक्यता देखील आहे.
घरची भाकरी घेऊन शिवसैनिक शिवाजी पार्कवर
तर दादरच्या शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. या मैदानवर देखील कार्यकर्ते जमण्यास सुरूवात झाली आहे. शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्याला दरवर्षी स्वयंस्फूर्तीने राज्यभरातून शिवसैनिक येतात. यावेळी ते स्वतःच्या जेवणाची सोय स्वतःच करतात. यावेळी देखील शिवाजी पार्कवर सकाळीच पोहचलेल्या शिवसैनिकांनी आम्ही १० वर्षांपासून मेळाव्याला येत असल्याचं एबीपी माझाशी बोलताना सांगितले. तसेच यावेळी हे शिवसैनिक स्वतःच्या घरातून भाकरी घेऊन आल्याचे पाहायला मिळालं.