वेटलिफ्टिंगपटू अचिंता शेऊलीने राष्ट्रकुल स्पर्धेतील पदार्पणातच सुवर्णयश संपादन करण्याची दमदार कामगिरी केली
बर्मिगहॅम : वेटलिफ्टिंगपटू अचिंता शेऊलीने राष्ट्रकुल स्पर्धेतील पदार्पणातच सुवर्णयश संपादन करण्याची दमदार कामगिरी केली. त्याने ७३ किलो वजनी गटात भारतासाठी यंदाच्या राष्ट्रकुलमधील तिसरे सुवर्ण, वेटलिफ्टिंगमधील एकूण सहावे पदक मिळवले.
अचिंताला या वजनी गटात सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्याने अपेक्षेप्रमाणे खेळ करताना स्नॅचमध्ये १४३ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १७० किलो असे एकूण ३१३ किलो वजन उचलत सुवर्ण कामगिरी केली. मलेशियाच्या एरे हिदायत मुहम्मदने अचिंताला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, एरेला एकूण ३०३ किलो (१३८ आणि १६५ किलो) वजन उचलता आले. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. शाद दारसिग्नने एकूण २९८ किलो (१३५ आणि १६३ किलो) वजनासह कांस्यपदक मिळवले.
कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अचिंताने स्नॅचमधील आपल्या तीन प्रयत्नांत अनुक्रमे १३७ किलो, १४० किलो आणि १४३ किलो वजन उचलले. तसेच क्लीन अँड जर्कमध्ये कोलकाताच्या अचिंताने १६६ किलो वजनाने सुरुवात केली. त्याचा १७० किलोचा दुसरा प्रयत्न अपयशी ठरला. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात त्याने हे वजन उचलत एकूण ३१३ किलो वजनासह राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वाधिक वजनाच्या विक्रमाची नोंद केली.
अजय सिंग चौथ्या स्थानी
भारताचा वेटलिफ्टिंगपटू अजय सिंगला पुरुषांच्या ८१ किलो वजनी गटात एकूण ३१९ किलो वजनासह चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याने स्नॅचमध्ये १४३ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १७६ किलो वजन उचलले. या गटात इंग्लंडच्या ख्रिस मरेने एकूण ३२५ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले.
लॉन बॉल : महिला संघाची पदकनिश्चिती
बर्मिगहॅम : भारताच्या महिला लॉन बॉल संघाने सोमवारी ऐतिहासिक कामगिरी करताना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पहिलेवहिले पदक निश्चित केले. त्यांनी चुरशीच्या झालेल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर १६-१३ अशी सरशी साधली.
या लढतीत भारतीय संघ दुसऱ्या फेरीअंती ०-५ असा पिछाडीवर होता. मात्र, त्यांनी दमदार पुनरागमन करताना नवव्या फेरीअंती ७-७ अशी बरोबरी साधली. मग पुढील फेरीत बाजी मारत १०-७ अशी आघाडी घेतली. परंतु न्यूझीलंडने खेळ पुन्हा उंचावत १४व्या फेरीअंती १३-१२ अशी निसटती आघाडी मिळवली. अखेरीस कर्णधार रूपाराणी तिर्कीच्या अप्रतिम खेळामुळे भारताने १६-१३ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.
लव्हली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया आणि कर्णधार तिर्की या भारतीय चौकडीची मंगळवारी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी गाठ पडेल.
टेबल टेनिस : भारतीय महिला संघ वादाच्या भो
बर्मिगहॅम : भारतीय टेबल टेनिस गेल्या काही काळात वादाच्या भोवऱ्यात सापडले असून राष्ट्रकुल स्पर्धेतही त्यांनी वाद ओढवून घेतला आहे. नियुक्त प्रशिक्षकांच्या अनुपस्थितीत गतविजेत्या भारतीय महिला टेबल टेनिस संघाला उपांत्यपूर्व फेरीत दुबळय़ा मलेशियाकडून हार पत्करावी लागली.
जागतिक क्रमवारीत कुठेच न दिसणाऱ्या मलेशियन खेळाडूंकडून झालेला पराभव भारतीयांच्या जिव्हारी लागला आहे. मलेशियाविरुद्धच्या सामन्यासाठी महिला संघाच्या प्रशिक्षिका अनिंदिता चक्रवर्ती उपस्थित न राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांच्याऐवजी भारतीय पुरुष संघाचे प्रशिक्षक एस. रमण यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. याचे पडसाद भारतात उमटले असून टेबल टेनिस संघटनेचा कारभार पाहणाऱ्या हंगामी समितीचे सदस्य एस. डी. मुदगिल यांनी महिला प्रशिक्षकांनी संघाबरोबर असायलाच पाहिजे होते, असे म्हटले आहे. तसेच आपण याचा जाब संघ व्यवस्थापनाला विचारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुरुष खेळाडू जी. साथियनचे वैयक्तिक प्रशिक्षक असणारे रमण हे या उपांत्यपूर्व फेरीतील लढतीदरम्यान रिथ रिशाला मार्गदर्शन करताना दिसले. या सामन्यातील पराभवानंतर मनिका बत्राच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पत्रकार परिषदेलाही उपस्थित राहिला नाही.
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी महिला टेबल टेनिस संघाची निवड झाल्यापासूनच वाद सुरू होते. या संघात स्थान मिळविण्यासाठी तीन खेळाडूंनी न्यायालयात धाव घेतली होती.
जिम्नॅस्टिक्स : प्रणती नायक पाचव्या स्थानी
भारताच्या प्रणती नायकला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमधील व्हॉल्ट प्रकारात महिलांच्या विभागात पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. यापूर्वी आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या प्रणतीने पहिल्या प्रयत्नात १३.६३३ आणि दुसऱ्या प्रयत्नात ११.७६६ गुण मिळविले. दोन प्रयत्नांनंतर तिचे सरासरी १२.६९९ गुण होते. पात्रता फेरीत तिने १३.२७५ गुणांची कमाई केली होती. तिचे दोन प्रयत्नांत अनुक्रमे ०.१ आणि ०.३ गुण दंड स्वरूपात कमी करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाची जॉर्जिया गॉडविन सुवर्ण, कॅनडाची लॉरी डेनॉमी रौप्य आणि स्कॉटलंडची श्ॉनन आर्चर कांस्यपदकाची मानकरी ठरली.
जलतरण : श्रीहरि नटराज अंतिम फेरीत
भारताचा जलतरणपटू श्रीहरि नटराजने पुरुषांच्या ५० मीटर बॅकस्ट्रोकच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्याने उपांत्य फेरीत २५.३८ सेकंद अशी वेळ नोंदवत आठव्या स्थानासह अंतिम फेरीत स्थान मिळवले. दुसरीकडे साजन प्रकाशने २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात निराशा केली. त्याला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला १०० मीटर बटरफ्लाय प्रकारातही उपांत्य फेरी गाठता आली नाही. प्रकाशने पात्रता फेरीत ५४.३६ सेकंद वेळेसह एकूण १९वे स्थान मिळवले.
बॅडिमटन : भारत मिश्र सांघिक गटाच्या उपांत्य फेरीत
गतविजेत्या भारतीय बॅडिमटन संघाने दक्षिण आफ्रिकेला ३-० अशा फरकाने पराभूत करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिश्र सांघिक गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. अश्विनी पोनप्पा आणि बी. सुमीत रेड्डी जोडीने पहिल्या सामन्यात जेराड एलियट आणि डेइड्रे जॉर्डन जोडीला २१-९, २१-११ असे नमवले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनने कॅडेन काकोराला २१-५, २१-६ असे पराभूत करत भारताची आघाडी दुप्पट केली. युवा आकर्षी कश्यपने जोहनिता श्कोल्ट्झवर २१-११, २१-१६ असा विजय साकारत भारताचे पुढच्या फेरीतील स्थान निश्चित केले.
स्क्वॉश : सौरव उपांत्य फेरीत, जोश्ना पराभूत
भारताचा आघाडीचा स्क्वॉशपटू सौरव घोषालने पुरुष एकेरी गटाची उपांत्य फेरी गाठली. त्याने स्कॉटलंडच्या ग्रेग लोबानवर ११-५, ८-११, ११-७, ११-३ अशी मात केली. महिला एकेरीत मात्र जोश्ना चिनप्पाला पराभवाचा सामना करावा लागला. तिला उपांत्यपूर्व फेरीत कॅनडाच्या होली नॉटनने ९-११, ५-११, १३-१५ असे पराभूत केले. भारताची १८ वेळा राष्ट्रीय विजेती जोश्ना सर्वोत्तम खेळ करू शकली नाही.
क्रिकेट : पूजा वस्त्रकार करोनामुक्त
भारताची अष्टपैलू पूजा वस्त्रकार करोनामधून सावरली असून लवकरच ती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी महिला संघात सहभागी होईल. करोनाची लागण झाल्याने वस्त्रकार आणि एस. मेघना यांना भारतीय संघासोबत बर्मिगहॅमसाठी रवाना होता आले नव्हते. मेघना करोनातून सावरल्यानंतर रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत खेळली. वस्त्रकार ३ ऑगस्टला बार्बाडोसविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यासाठी उपलब्ध असेल.
सायकलिंग : मयुरी लुटेला सायकलिंगमध्ये महिलांच्या ५०० मीटर टाइम ट्रायलच्या अंतिम फेरीत ३६.८६८ सेकंद अशा वेळेसह १८व्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरुष विभागातील १००० मीटर टाइम ट्रायलमध्ये रोनाल्डोला १२व्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने १ तास ०२.५०० मिनिटे अशी वेळ नोंदवली. सुवर्णपदक विजेत्या मॅथ्यू ग्लाएत्झरपेक्षा तो २.९९५ सेकंदांनी मागे राहिला. दोनच महिन्यांपूर्वी रोनाल्डोने आशियाई ट्रॅक अजिंक्यपद स्पर्धेतील स्प्रिंट प्रकारात रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता.
अॅथलेटिक्स : ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने माघार घेतल्यानंतर भारताच्या अॅथलेटिक्स पथकाला धक्का बसला असला, तरीही मंगळवारपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकुलमधील अॅथलेटिक्स स्पर्धामध्ये भारताला पदकाच्या अपेक्षा आहेत. नीरजच्या अनुपस्थितीत लांब उडीपटू मुरली श्रीशंकर, स्टीपलचेसपटू अविनाश साबळे, अनुभवी थाळीफेकपटू सीमा पुनिया आणि भालाफेकपटू अन्नू राणीच्या कामगिरीकडे नजर असेल. मंगळवारी लांबउडीपटू श्रीशंकर आणि मुहम्मद अनीस याहिया भारताच्या अॅथलेटिक्समधील मोहिमेला प्रारंभ करतील.
बॉक्सिंग : भारतीय बॉक्सिंगपटू अमित पंघाल (५१ किलो वजनी गट) आणि मोहम्मद हसमुद्दीन (५७ किलो) यांनी आपापल्या लढतीत विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यामुळे त्यांनी पदकाच्या दिशेने वाटचाल केली आहे. पंघालने वानुआतू देशाच्या नमरी बेरिला एकतर्फी सामन्यात ५-० अशा फरकाने पराभूत केले. दुसरीकडे, हसमुद्दीननेही बांगलादेशच्या मोहम्मद सलिम हुसैनाला मोठय़ा फरकाने नमवत आगेकूच केली.
हॉकी : भारताला इंग्लंडने बरोबरीत रोखले
बर्मिगहॅम : तिसऱ्या मिनिटाला गोल करून केलेली वेगवान सुरुवात आणि त्यानंतर मध्यांतराला मिळवलेल्या तीन गोलच्या आघाडीनंतरही चौथ्या सत्रात बचाव फळीने केलेल्या चुकांमुळे भारतीय पुरुष हॉकी संघाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दुसऱ्या साखळी सामन्यात यजमान इंग्लंडविरुद्ध ४-४ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.
तिसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर ललित उपाध्यायने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर इंग्लंडला चेंडूवर अधिक वेळ ताबा मिळविण्यात यश आले. मात्र, भारताने गोलच्या संधींचे सोने करताना केले. मनदीप सिंगने (१३ आणि २२वे मिनिट) दोन गोल करताना भारताला मध्यांतराला ३-० अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धातील तिसऱ्या सत्रात दोन्ही संघातील खेळाडूंनी बचावाचे धोरण अवलंबले. लियाम अन्सेलने ४२व्या मिनिटाला इंग्लंडचे खाते उघडले. त्यानंतर चौथ्या सत्रात ४६व्या मिनिटाला मिळालेली कॉर्नरची संधी हरमनप्रीतने अचूक साधली. या गोलने भारताला ४-१ अशी मिळवून दिली. मात्र, अखेरच्या दहा मिनिटांवर इंग्लंडने वर्चस्व गाजवले. निकोलस बँडुरकने ४७व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर तीन मिनिटात दोन गोल करून इंग्लंडने बरोबरी साधली. ५०व्या मिनिटाला फिलिप रॉपर आणि ५३व्या मिनिटाला बँडुरकने गोल केल्यामुळे इंग्लंडने सामना ४-४ असा बरोबरीत राखला.
वेटलिफ्टिंग : उपचारासाठी संकेत इंग्लंडमध्येच थांबणार
राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता भारताचा वेटलिफ्टिंगपटू संकेत सरगर कोपराच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी इंग्लंडमध्येच थांबणार आहे. संकेतने राष्ट्रकुल स्पर्धेतील ५५ किलो वजन गटात रौप्यपदक पटकावले होत. मात्र स्नॅच प्रकारात वजन उचलताना कोपराला झालेल्या दुखापतीमुळे त्याला सोनेरी यशापासून वंचित राहावे लागले. त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान तीन महिन्यांचा अवधी लागणार आहे. उपचारासाठी संकेतपुढे मायदेशी परतणे किंवा इंग्लंडमध्येच थांबणे असे दोनच पर्याय होते. इंग्लंडमध्ये संकेतला अधिक चांगले उपचार मिळण्याची शक्यता असल्याने त्याला तिथेच थांबण्यास सांगण्यात आल्याचे संघ व्यवस्थापनेच्या सूत्रांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील सांगलीचा रहिवासी असलेल्या २१ वर्षीय संकेतने स्नॅचमध्ये ११३ आणि क्लीन अँड जर्कमध्ये १३५ असे एकूण २४८ किलो वजन उचलले होते.
ज्युडो : सुशीलाला रौप्य, विजयला कांस्यपदक
बर्मिगहॅम : भारतीय ज्युडोपटू सुशीला देवी आणि विजय कुमार यादव यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत सोमवारी चमकदार कामगिरी करताना पदकांची कमाई केली. सुशीलाने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात रौप्य, तर पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात विजयने कांस्यपदक मिळवले.सुशीलाला अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मिशेला व्हाइटबोईने ‘वाझा-अरी’ डावपेचासह पराभूत केले. सुशीलाचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे दुसरे पदक ठरले. तिने २०१४च्या ग्लासगो येथे झालेल्या स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते.
दुसरीकडे, विजय यादवने कांस्यपदकाच्या लढतीत सायप्रसच्या पेट्रोस ख्रिस्तोडौलिडेसला ‘इप्पॉन’ डावपेचासह नमवले. २०१८ आणि २०१९ मध्ये राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या विजयला उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जॉश्वा काट्जकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, विजयने स्कॉटलंडच्या डायलोन मनरोला ‘वाझा-अरी’ डावपेचाने हरवत कांस्यपदकाच्या लढतीसाठी पात्रता मिळवली.