नवी मुंबई : नवीन मुंबईतील ऐरोली येथील सामाजिक कार्यकर्ते रामहरी विश्वासराव बेस्टमधून २८ वर्षाच्या निष्कलंक सेवेनंतर निवृत्त झाले. विश्वासराव परिवाराच्या वतीने ३० सप्टेंबर २०२३ रोजी रामहरी विश्वासराव यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा ऐरोली येथील सेक्टर ५ मधील श्रीमती जानकीबाई मढवी सभागृहांमध्ये संपन्न झाला. नवी मुंबईचे लोकप्रिय व ज्येष्ठ नगरसेवक श्री. एम. के. मढवी यांच्या हस्ते रामहरी विश्वासराव यांचा सपत्नीक शाल, पुष्पगुच्छ,श्रीफळ व विठ्ठल रुखमाईची मूर्ती भेट वस्तू देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी बेस्टच्या घाटकोपर डेपोचे वरिष्ठ वाहतूक अधिकारी श्री. अर्जुन मांजरेकर होते. ज्येष्ठ नगरसेवक श्री. एम. के. मढवी यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात सांगितले की, रामहरी विश्वासराव यांचा मला निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. त्यांचे शिवांश मिसळ हॉटेल असून ते लोकांना चांगली रुचकर मिसळ व वडा पाव देतात. त्याचप्रमाणे शिवशंकर विवाह मंडळामार्फत अनेकांचे विवाह जमवून आणतात. ते एक प्रामाणिक व निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते आहेत.
बेस्टचे वरिष्ठ वाहतूक अधिकारी श्री. अर्जुन मांजरेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, रामहरी विश्वासराव यांनी बेस्टमध्ये २८ वर्ष बस चालक, बस वाहक व बस निरीक्षक म्हणून प्रामाणिकपणे आणि निष्कलंक सेवा केली. त्यांच्याकडे कामाचा चांगला अनुभव आहे. त्यांना बेस्ट प्रशासनाच्या वतीने सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. याप्रसंगी नवी मुंबईचे माजी प्रभाग समिती सदस्य श्री. आनंदराव नाईक, बेस्टचे सेवानिवृत्त वाहतूक अधिकारी किशोर पाटील, ह. भ.प. विष्णु महाराज थोरवे, पुणे जिल्हा रहिवासी उत्कर्ष मंडळाचे सचिव व पत्रकार रवींद्र आवटी, थोरांदळे गावचे माजी सरपंच गणेश गुंड, मराठी उद्योजक अक्षय गांजाळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका नूतन विश्वासराव, पायल वीर आदी मान्यवरांची शुभेच्छापर भाषणे झाली. सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिध्दीप्रमुख व पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांनी केले. सत्कार सोहळ्यास जय हनुमान दूध उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन डॉ. दत्तात्रय विश्वासराव, एअर इंडियाचे सेवानिवृत्त मॅनेजर सूर्यकांत दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी व पाहुण्यांनी शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ व भेटवस्तू देऊन रामहरी विश्वासराव यांचा सत्कार केला. कार्यक्रमाला बेस्ट कामगार, कर्मचारी, ऐरोली येथील स्थानिक रहिवासी, नातेवाईक व पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.