mumbai : फादर नाईझील बॅर्रेट यांच्या वाढदिवसानिमित्त आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व रोझरी हायस्कूल आयोजित विनाशुल्क रोझरी ट्रॉफी आंतर शालेय सांघिक कॅरम स्पर्धेत अँटोनिया डिसोझा हायस्कूल-भायखळा, ईझाक न्यूटन ग्लोबल स्कूल-वसई, मराठा हायस्कूल-वरळी, सेंट जोसेफ हायस्कूल-डोंगरी, सर एली कदुरी हायस्कूल-माझगाव, समता विद्यामंदिर-घाटकोपर आदी शाळांनी सलामीचे सामने जिंकले. रोझरी हायस्कूलच्या प्रिन्सिपल सिस्टर विजया चलील, प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे शानदार उदघाटन झाले.
डॉकयार्ड रोड येथील कॅरम स्पर्धेत डिसोझा हायस्कूलने रोझरी हायस्कूलवर २-१ असा चुरशीचा विजय मिळविला. मोईनुद्दीन अन्सारीने रीदा डालियाचा १९-३ असा तर श्रावण रेणुसेने आर्यन डेंगळेचा ११-१० असा पराभव करून डिसोझा हायस्कूलचा विजयी मार्ग सुकर केला. ईशान शिंदेने आयुष कांबळेला १३-४ असे हरवून रोझरी हायस्कूलचा एकमात्र विजय नोंदविला. दुसऱ्या सामन्यात सिमरन शिंदे व सुजल मोरे यांच्या विजयी खेळामुळे मराठा हायस्कूलने सेंट ईझाबेल हायस्कूलचे आव्हान २-१ असे संपुष्टात आणले. सिमरन शिंदेने सारथी सोनावणेवर १५-१ अशी मात करून मराठा हायस्कूलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु प्राचीती फोंडेकरने सुमित साळुंखेला १०-५ असे चकवून सेंट ईझाबेल हायस्कूलला १-१ अशी बरोबरी करून दिली. तिसऱ्या निर्णायक सामन्यात सुजल मोरेने वर्षा राजभरचा १४-२ असा पराभव करून मराठा हायस्कूलचा दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित केला.
अन्य सामन्यात ईझाक स्कूलने रोझरी ब संघाचा ३-० असा पराभव करतांना यद्नेश देवरे, सिद्धांत चौधरी, श्रीशान पालवणकर चमकले. रुद्र दळवीच्या निर्णायक विजयामुळे सेंट जोसेफ हायस्कूलने ज्ञानेश्वर विद्यालयाला २-१ असे चकविले. समता विद्यामंदिरने चेंबूरच्या अफॅक हायस्कूलवर ३-० अशी बाजी मारतांना लोकेश पुजारी, निहाल खत्री, मोनेश डेंगे यांनी विजयी खेळ केला. क्रीडा शिक्षक राम गुडमे, मोझेस लोपीस, प्रॉमिस सैतवडेकर, सचिन शिंदे, अविनाश महाडिक, सुनील खोपकर यांनी सामन्यावरील पंचाचे कामकाज केले.