MUMBAI/NHI : फादर नाईझील बॅर्रेट यांच्या वाढदिवसानिमित्त आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व रोझरी हायस्कूल आयोजित विनाशुल्क रोझरी ट्रॉफी आंतर शालेय सांघिक कॅरम स्पर्धेत मराठा हायस्कूल-वरळी शाळेने अजिंक्यपद पटकाविले. मराठा हायस्कूलने भायखळ्याच्या अँटोनिया डिसोझा हायस्कूलचा २-१ असा पराभव करतांना सिमरन शिंदे व सुजल मोरे यांनी विजयी खेळ केला. आयुष कांबळेने शर्थीचे प्रयत्न करूनही डिसोझा हायस्कूलला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचा तृतीय क्रमांक ईझाक न्यूटन ग्लोबल स्कूल-वसई व चतुर्थ क्रमांक सर एली कदुरी हायस्कूल-माझगाव संघांनी मिळविला.
सिमरन शिंदेने सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखत डिसोझा हायस्कूलच्या श्रावण रेणुसेचा २२-१० असा पराभव करून मराठा हायस्कूलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात आयुष कांबळेने अचूक फटके मारत सुमित साळुंखेला २०-४ असे नमवून डिसोझा हायस्कूलला १-१ अशी बरोबरी साधून दिली. तिसऱ्या निर्णायक सामन्यात सुजल मोरेने आक्रमक व बचावात्मक खेळाचा सुरेख संगम साधत मोईनुद्दीन अन्सारीचा १५-२ असा पाडाव केला आणि मराठा हायस्कूलच्या विजेतेपदावर २-१ असा शिक्कामोर्तब केला.
उपांत्य फेरीत मराठा हायस्कूलने ईझाक हायस्कूलवर २-१ असा तर डिसोझा हायस्कूलने कदुरी हायस्कूलचा २-१ असा पराभव केला. स्पर्धेचे उपांत्यपूर्व उपविजेतेपद रोझरी हायस्कूल अ आणि ब संघ-डॉकयार्ड रोड, सेंट जोसेफ हायस्कूल-डोंगरी, समता विद्यामंदिर- घाटकोपर संघांनी मिळविला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा फादर नाईझील बॅर्रेट, सिस्टर विजया चलील, क्रीडा शिक्षक राम गुडमे, मोझेस लोपीस, प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संयोजक लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला. डीएसओ कॅरम स्पर्धेची पूर्वतयारी करण्यासाठी शालेय खेळाडूंना प्रोत्साहन दिल्याबद्दल शालेय संस्था व पालकवर्गाने संयोजकांच्या कार्याचे कौतुक केले.