गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून जणूकाही रुसून बसलेला पाऊस अखेर अवतरला असून पुढचे पाच दिवस महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तो सक्रीय राहणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. यासंदर्भात पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये होसाळीकर यांनी मुंबईतील कुलाबा वेधशाळेकडून जारी करण्यात आलेला तक्ताच शेअर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात कधी आणि किती प्रमाणात पाऊस पडेल, याविषयीचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत उकाड्यानं नागरिक हैराण झाले होते. शुक्रवारी रात्रीच महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूननं हजेरी लावली. आज सकाळपासून पुणे, मुंबईत पावसाच्या सरी बरसल्या आणि नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात मान्सून सक्रीय झाला असून येत्या पाच दिवसांत मनसोक्त कोसळणार असल्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.
के. एस. होसाळीकरांनी केलेल्या ट्वीटमध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पुढच्या पाच दिवसांत मान्सून सक्रीय राहण्याचा अंदाज नमूद करण्यात आला आहे. यानुसार कोकण व विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज नमूद करण्यात आला आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर असेल, असंही वेधशाळेकडून सांगण्यात आलं आहे.
मुंबईत आज आणि उद्या अर्थात २४ आणि २५ जून रोजी मध्यम तीव्रतेचा तर २६ ते २८ जून या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे आणि पालघरमध्येही याच प्रमाणात पुढचे पाच दिवस पाऊस असेल.
24 Jun: राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता. ☔☔🌧
🔸कोकणात व विदर्भात काही दिवस मुसऴधार ते अती मुसऴधार.
🔸पुणे सातारा नाशिक ही मुसऴधार ते अती मुसऴधार.
🔸मराठवाडा मध्ये ही पावसाचा जोर राहील.@RMC_Mumbai@imdnagpur @ClimateImd pic.twitter.com/Jizm22NeKx— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 24, 2023
रायगडमध्ये २५ जून ते २८ जून या कालावधीत मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरीत २४ ते २६ जून या तीन दिवसांत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस, तर २८ व २८ जून रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गात २४ जून रोजी मुसळधार ते अतीमुसळधार तर २५ ते २७ जून या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.