mumbai : यंदा क्रिकेट हंगामात रुग्णालयीन क्रिकेट संघांसाठी विक्रमी पाच आयडियल टी-२० क्रिकेट स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष लीलाधर चव्हाण यांचा विशेष गौरव शिवाजी पार्क मैदानात करण्यात आला. नुकत्याच झालेल्या या वर्षातील पाचव्या आयडियल आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेप्रसंगी रुग्णालयीन क्रिकेटपटूं व आयडियलमार्फत मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ क्रिकेट पंच व माजी क्रिकेटपटू संदीप ठाकूर यांचा देखील शाल, श्रीफळ व सन्मानचिन्हासह गौरव करण्यात आला.
संयोजक लीलाधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आमदार सचिनभाऊ चषक, ओम्नी चषक, क्रीडाप्रेमी दिलीप करंगुटकर स्मृती चषक, आरएमएमएस अमृत महोत्सवी चषक व डॉ. जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषक सामने यशस्वी झाले. साखळी व बाद पद्धतीचे आंतर रुग्णालयीन क्रिकेट सामने १ नोव्हेंबर २०२२ ते ५ जून २०२३ दरम्यान शिवाजी पार्क, आझाद मैदान व क्रॉस मैदानात रंगले. हंगाम समारोप प्रसंगी प्रथमच आंतर हॉस्पिटल डबल विकेट आणि सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धा आयोजित करून त्यांनी रुग्णालयीन क्रिकेटपटूंमध्ये अनोखा जोश निर्माण केला. याप्रसंगी गेली दोन दशकाहून अधिक काळ दर्जेदार क्रिकेट पंच म्हणून कार्यरत असलेले संदीप ठाकूर यांनी आयडियल स्पर्धेवेळी तांत्रिक सहकार्य केल्याबद्दल आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.