मुंबई : कप्तान प्रदीप क्षीरसागरच्या दमदार अर्धशतकामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने कस्तुरबा हॉस्पिटलचा ६ विकेटने पराभव केला आणि क्रीडापटू गोविंदराव मोहिते यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवी आरएमएमएस चषक आंतर हॉस्पिटल टी-२० ब गट क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुपतर्फे आरएमएमएस सहकार्याने झालेल्या स्पर्धेत मंगेश आगेने अष्टपैलू खेळ करूनही कस्तुरबा हॉस्पिटल संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, सुनील बोरकर, शिवाजी काळे यांच्या उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना गौरविण्यात आले.
शिवाजी पार्क मैदानात ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विरुद्ध कस्तुरबा हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. अरुण पारचा (११ धावांत २ बळी), प्रफुल मारू (२४ धावांत २ बळी), प्रदीप क्षीरसागर (२९ धावांत २ बळी) यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे कस्तुरबा हॉस्पिटलचा निम्मा संघ दहाव्या षटकाला ५२ धावसंख्येवर तंबूत परतला. तरीही मंगेश आगे (२१ चेंडूत ४२ धावा) व रोहन ख्रिस्तियन (१८ चेंडूत २५ धावा) यांनी सहाव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केल्यामुळे कस्तुरबा हॉस्पिटलने १२८ धावसंख्येपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल सलामीवीर प्रदीप क्षीरसागर (४९ चेंडूत ५७ धावा), रोहन महाडिक (२१ चेंडूत २९ धावा) व इसाकी मुत्तू (१७ चेंडूत २३ धावा) यांनी आक्रमक फलंदाजी करून ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने १५ व्या षटकाला ४ बाद १३१ धावा फटकावीत सामना जिंकला. अष्टपैलू मंगेश आगे, डॉ. परमेश्वर मुंडे, स्वप्नील पाटील यांनी विकेट घेणारी गोलंदाजी केली. ब गटामध्ये प्रदीप क्षीरसागरने सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूचा, कल्पेश भोसलेने उत्कृष्ट फलंदाजीचा तर मंगेश आगेने उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार पटकाविला.
******************************