मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. या सुरक्षा रक्षकांनी राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला असून कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. त्यानंतर आज अचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहोचल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, राऊत यांच्या घरी ईडीची चौकशी किती काळ चालेल याबाबत काहीच सांगता येत नाही.कदाचित संजय राऊतांना आज किंवा उद्या सकाळपर्यंत अटक होण्याची शक्यता आहे.
आज सकाळी संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे. मागच्या अनेक दिवसांपासून संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. संजय राऊत सद्या त्यांच्या कुटुंबियांसोबत घरी आहेत. अनेक प्रकरणांमध्ये त्यांची आज चौकशी होण्याची शक्यता आहे. ईडीने दोनदा संजय राऊत यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलं होतं. त्यावेळी मी कोणाला घाबरत नाही असं त्यांनी वारंवार सांगितलं होतं. केंद्राच्या सांगण्यावरून आमच्यावर टीका केली जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं.
आज दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी होईल. यात त्यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. याशिवाय घराची झडतीही घेतली जाण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी ईडीने आधीही संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून केली आहे. मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. यासंदर्भात ईडीनं कारवाई केली होती.