मुंबई :अमीर बिल्डींग हितचिंतक नवरात्रौत्सव मंडळ-डोंगरी आयोजित क्रिकेटपटू प्रमोद सुर्वे स्मृती चषक लीग क्रिकेट स्पर्धेत झुबेर सय्यदच्या समीर स्मॅशर्सने सलामीचा साखळी सामना जिंकला. समीर स्मॅशर्सने जुगनू सिंहच्या सिंह पॅकर्स डोंगरीचा ८ विकेटने पराभव केला. डोंगरी येथील छत्रपती वीर संभाजी मैदानात रोहन पारकरला सामनावीर पुरस्कार देऊन क्रिकेटप्रेमी दीपक सुर्वे, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, क्रिकेटपटू राजेश सुर्वे, अनंत सुर्वे, पार्थ सुर्वे, सिध्देश सुर्वे, साईश सुर्वे आदी मान्यवरांनी गौरविले.
साखळी अ गटात समीर पकर्सचा प्रमुख गोलंदाज रोहन पारकरच्या (८ धावांत ३ बळी) अचूक माऱ्यामुळे प्रथम फलंदाजी करताना सिंह पकर्सला मर्यादित ५ षटकात ६ बाद ३२ धावांच काढता आल्या. अष्टपैलू अमरीश नाईकने (१० चेंडूत ९ धावा) डाव सावरण्याचा छान प्रयत्न केला. प्रतिक जैनच्या (१७ चेंडूत २१ धावा) आक्रमक फलंदाजीमुळे समीर स्मॅशर्सने ३ चेंडू राखून २ बाद ३३ अशी विजयी धावसंख्या सहज रचली.
दुसऱ्या साखळी सामन्यात मुबीन मुल्लाच्या एम.एम. मोटर्स विरुद्ध महेंद्र पटेलच्या दीक्षिता इलेव्हनने ३ बाद ३६ धावा फटकाविताना करण भारती (१० चेंडूत १५ धावा) व श्रीलेश अमरे (१३ चेंडूत १३ धावा) यांनी चौफेर फटकेबाजी केली. रोहित कोळी (४ धावांत २ बळी), गौरव मिसाळ (६ धावांत २ बळी) व अष्टपैलू श्रीलेश अमरे (१० धावांत २ बळी) यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे एम.एम. मोटर्सला मर्यादित षटकात ७ बाद २९ धावसंख्येपर्यंतच मजल गाठता आली. परिणामी दीक्षिता इलेव्हनने ७ धावांनी शानदार विजय मिळविला. कार्यकारी समितीचे विलास मटाले, अविनाश दुधाणे, चंद्रकांत करंगुटकर, वीरेंद्र पाटील, नरेश तोडणकर, प्रशांत म्हात्रे, किरण खडपे, अमित कांबळी, भूषण राऊत, अनुज कांबळे, आशिष चिंदरकर, विनय भगत, मनोज मानकर, जुगनू सिंह, राहुल थळे, राजेश मांजरेकर, शाहबाज शेख, मोहन अत्रे आदी मंडळी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष कार्यरत आहेत.
******************************