प्लॅनेट मराठी नेहमीच नवनवीन, वेगळ्या विषयांद्वारे प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत असते. कोणतीही वेबसीरिज असो किंवा कोणताही टॉक शो त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभतेच. आता प्लॅनेट मराठी प्रस्तुत ”त्या’ नंतर सगळं बदललं’ हा नवाकोरा पॉडकास्ट शो प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या शोची सूत्रसंचालिका सानिका मुतालिक आहे. या शोमध्ये कलाकारांच्या आयुष्यात नक्की कोणत्या ‘त्या’ गोष्टींनंतर सगळं बदललं, विजयाच्या शिखरावर असताना पाठी वळून जेव्हा ते बघतात, तेव्हा त्यांना कसं वाटतं, या सगळ्या रंजक गोष्टींचा खुलासा या पॉडकास्ट शोद्वारे प्रेक्षकांसमोर होणार आहे. या शोचे ३ एपिसोड्स प्रदर्शित झाले असून हेमांगी कवी, आदिनाथ कोठारे आणि सुयश टिळक यांनी या शोमध्ये हजेरी लावून अनेक गंमतीदार, मजेदार तर कधी भावनिक करणारे अनेक किस्से सांगितले.
‘त्या नंतर सगळं बदललं’च्या पहिल्या एपिसोडमध्ये सुयश टिळकने त्याचा फोटोग्राफर ते अभिनेता होण्यापर्यंतचा प्रवास सांगितला तर दुसर्या एपिसोडमध्ये हेमांगी कवीने ट्रेंडमुळे होणार्या ट्रोलिंगचा कसा सामना करावा लागला, त्याचा किस्सा सांगितला. आदिनाथ कोठारेमध्ये आणि जीजामध्ये घडणार्या अनेक गंमतीजंमतींचे भन्नाट किस्से तिसर्या एपिसोडमध्ये बघायला मिळतील. आगामी एपिसोडमध्ये कोणता नवीन कलाकार सहभागी होणार आणि त्याचे किंवा तिचे कोणते नवीन किस्से ऐकायला मिळणार, यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार असून लवकरच नवीन एपिसोड प्लॅनेट मराठीच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येतील. दर रविवारी सकाळी ११ वाजता प्रदर्शित होणाऱ्या या शोचे पाच भाग आहेत.
प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “प्रेक्षकांना लहान व्हिडिओ, पॉडकास्ट शो पाहायला आवडतात. कलाकारांच्या आयुष्यात घडलेले अनेक रंजक, मजेदार किस्से, त्यांच्यासोबत पडद्यामागे घडलेल्या अनेक मजेदार घटना जाणून घ्यायच्या असतात. चाहत्यांच्या याच विषयाला केंद्रस्थानी ठेवून त्यांची आवड जोपासत आम्ही हा पॉडकास्ट शो प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आलो आहोत. कलाकारांच्या आयुष्यात नेमकं काय घडतं, त्यांना काय आवडतं, कोणत्या कारणामुळे ते आज इथपर्यंत पोहोचले, या सगळ्या गोष्टी या पॉडकास्ट शोद्वारे प्रेक्षकांना समजतील.”