MUMBAI/NHI
मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट अर्थात ‘एमईटी’ने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात व्यवस्थापन कौशल्य शिकवणारा पदव्युत्तर अभ्यासक्रम (Post Graduate Diploma in Management (PGDM)) विद्यार्थ्यांच्या सोयीखातर उपलब्ध करून दिला आहे. या अभ्यासक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गीतकार, पटकथाकार, संवाद लेखक श्री. जावेद अख्तर यांनी आज आयोजित कार्यक्रमात केले.
या प्रसंगी बोलताना जावेद अख्तर यांनी म्हटले की, “पूर्वी इच्छुकांना आवश्यक ते शिक्षण मिळत नव्हते. त्यांना काम करता करता अनुभव मिळवणं गरजेचं होतं. यामुळे या अभ्यासक्रमासाठी एमईटीचं अभिनंदन करणं गरजेचं आहे. जे काम सरकारने करणे गरजेचे आहे ते एमईटी करत असल्यामुळे त्यांचे विशेष अभिनंदन करावे लागेल. अख्तर यांनी पुढे म्हटले की, “हल्लीच्या काळात माहिती आणि ज्ञानाचा वेगाने मारा होऊ लागला आहे. याचा वेग जरी प्रचंड असला तरी त्यातून काही समस्याही निर्माण होताना दिसत आहे. माहिती आणि ज्ञानाच्या या वेगवान माऱ्यात वरवरची माहिती मिळते आहे. वेगवान माहिती मिळवत असताना ती सखोल असणंही गरजेचं आहे. अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांमुळे वेगवान पद्धतीने आणि सखोल माहिती किंवा ज्ञान मिळण्यास मदत होईल अशी मला खात्री आहे.”
हा अभ्यासक्रम सुरू करण्यामागची कल्पना विषद करताना ‘एमईटी’चे संस्थापक अध्यक्ष श्री. छगन भुजबळ म्हणाले की “माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र हे झपाट्याने विकसित होत चालले आहे. विशेषतः मोबाईल आणि इंटरनेटच्या वापरामुळे या क्षेत्रात प्रचंड प्रगती होत असून जर विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण मिळाले तर इथे करिअर बनवण्याची विद्यार्थ्यांसमोर मोठी संधी आहे. ही संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये व्यवस्थापन कौशल्य शिकवणारा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला माध्यम आणि मनोरंज क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. ज्यामध्ये कवी, अभिनेता, विनोदवीर आणि लेखक श्री.शैलेश लोढा, अभिनेते श्री.स्वप्नील जोशी, अभिनेता आणि दिग्दर्शक-निर्माते श्री.आदिनाथ कोठारे, फेमस इनोव्हेशनचे संस्थापक श्री.राज कांबळे, रॅडीफसन समूहाचे राष्ट्रीय सृजन संचालक श्री.प्रमोद शर्मा, दिग्दर्शक आणि लेखक श्री.अजित वाडीकर, व्हाईट रिव्हर डिजिटलचे सीईओ श्री.श्रेणिक गांधी हे उपस्थित होते. याशिवाय माध्यम आणि मनोरंज क्षेत्रातील अन्य नामवंत व्यक्तींनी या क्षेत्रासंबंधीच्या परिसंवादात भाग घेतला होता. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राची सद्यस्थिती व या क्षेत्रांमधील व्यवस्थापनाची गरज यावर परिसंवादात सहभागी झालेल्या मंडळींनी आपली मते मांडली.या परिसंवादामध्ये मान्यवरांनी क्रिएटीव्हिटीच्या व्यवसायाविषयी आणि माध्यमे तसेच मनोरंजन क्षेत्राची विश्वासार्हता वाढीच्या गरजेबाबच आपली मते मांडली.
माध्यम क्षेत्राची विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती मिळावी यासाठी हा एमबीए अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. अभ्यासक्रमातील संकल्पना विद्यार्थ्यांना नीट कळाव्यात यासाठी विविध प्रकारच्या मार्गांचा वापर करण्यात आला आहे. पुस्तकातील ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी या अभ्यासक्रमात विशेष काळजी घेण्यात आली आहे. जाहिरात, पत्रकारिता, डिजिटल, जनसंपर्क, ब्रँडचे व्यवस्थापन आणि संवाद, माध्यम संशोधन, माध्यमातील विविध गोष्टी आणि ग्राहकांचा कल जाणून घेण्याची तंत्रे आणि मनोरंजन क्षेत्रातील विपणन यासारख्या विषयांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. नव्या युगातील संकल्पना जसे की आर्टिफिशिअल इंटीलिजन्स (AI), ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR), व्हर्चुअल रिअॅलिटी (VR) याबाबतही शिकवले जाणार आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास या अभ्यासक्रमामुळे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये व्यवस्थापन कौशल्यासाठी गरजेच्या असलेल्या सगळ्या गोष्टींचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळू शकणार आहे.