मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप तर्फे सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-भायखळा सहकार्याने ३ एप्रिलपासून क्रीडाप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक द्वितीय आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शिवाजी पार्क मैदानातील माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर प्रथम साखळी व त्यानंतर बाद पद्धतीने १८ एप्रिलपर्यंत रंगणार आहे. स्पर्धेनिमित्त रुग्णालयीन क्रिकेटपटू रहेजा हॉस्पिटलचे चेतन सुर्वे, केडीए हॉस्पिटलचे ओमकार पाटील, जसलोक हॉस्पिटलचे श्रीकांत दुधवडकर व जे.जे. हॉस्पिटलचे इक्बाल सय्यद यांचा विशेष गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली.
पहिल्या चार विजेत्या-उपविजेत्यांना स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक व संघातील खेळाडूंना वैयक्तिक सन्मान पदकांचा पुरस्कार दिला जाईल. सर्वोत्तम क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज तसेच प्रत्येक संघातील उत्कृष्ट खेळाडूस पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. स्पर्धेचा ड्रॉ २७ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वा. आरएमएमएसचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या हॉस्पिटल क्रिकेट संघांनी प्रवेश अर्जासाठी उपाध्यक्ष चंद्रकांत करंगुटकर अथवा ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल क्रिकेट संघाचे कप्तान प्रदीप क्षीरसागर (७९७७४७१९४३) यांच्याकडे २६ मार्चपर्यंत संपर्क साधावा.