MUMBAI/NHI
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आरएमएमएस व आयडियल ग्रुपतर्फे क्रीडाप्रेमी आमदार सचिनभाऊ अहिर चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी १६ मार्चला कस्तुरबा हॉस्पिटल विरुद्ध ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये चुरस होईल. अष्टपैलू रोहन ख्रिस्तियन, डॉ. परमेश्वर मुंडे, अष्टपैलू अंकुश जाधव, महेश सणगर आदी क्रिकेटपटूंचा कस्तुरबा हॉस्पिटल क्रिकेट संच विरुद्ध अष्टपैलू प्रदीप क्षीरसागरच्या नेतृत्वाखालील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल क्रिकेट संघ यामध्ये अटीतटीची उपांत्य लढत शिवाजी पार्क येथील माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर गुरुवारी सकाळी ९.३० वा. होईल. अष्टपैलू रोहन महाडिकच्या खेळावर ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलची विशेष मदार असेल.
अंतिम फेरी गाठण्यासाठी जे.जे. हॉस्पिटल विरुद्ध लीलावती हॉस्पिटल यामध्ये देखील १६ मार्चला दुपारी लढत होणार आहे. अष्टपैलू मनोज जाधव, विलास जाधव, नरेश शिवतरकर, प्रवीण सोळंकी आदींचा जे.जे. हॉस्पिटल क्रिकेट संघ विरुद्ध रुपेश कोंडाळकर, मनोहर पाटेकर, धर्मेश स्वामी, अंकित साळसकर आदींचा लीलावती हॉस्पिटल क्रिकेट संघ, असा उपांत्य फेरीचा सामना रंगतदार होईल. दोन्ही संघ बलाढ्य असल्यामुळे क्रिकेट शौकिनांना रंगतदार लढत पाहण्यास मिळेल.
कामगार विभागातील नवोदित व उदयोन्मुख खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारात सातत्याने प्रोत्साहन देण्यासाठी कामगार नेते आमदार सचिनभाऊ अहिर हे कार्यरत असल्यामुळे त्यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त यंदाही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष चंद्रकांत करंगुटकर, मंगेश चिंदरकर, राजन राणे, अजित आचरेकर आदी मंडळी कार्यरत आहेत.