प्रतिनिधी/ NHI
मुंबई : माझगाव क्रिकेट क्लब आयोजित मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यतेच्या पहिल्या नवी मुंबई प्रीमियर लीग-एनएमपीएल क्रिकेट स्पर्धेत बेलापूर ब्लास्टर्सने विजयी प्रारंभ केला. बेलापूर ब्लास्टर्सने ओमकार उंबरकरच्या नाबाद अर्धशतकामुळे सानपाडा स्कोर्पियन्सचा ७ गडी राखून पराभव केला. सानपाडा संघाचा सलामीवीर अरुण लवांडेने पाउणशतक ठोकून ठाणेकरांची दाद मिळविली. ओमकार उंबरकरला सामनावीर पुरस्काराने ठाणे जिल्ह्याचे कलेक्टर अशोक शृंगारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी एनएमपीएलचे चेअरमन शाह आलम शेख, प्रदीप कासलीवाल, अभिजित घोष, भूपेंद्र सिन्हा आदी उपस्थित होते. अंबरनाथ अवेन्जर्सने पहिला साखळी सामना जिंकताना कोपरखैरणे टायटन्स संघाला ६ विकेटने नमविले.
दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर बेलापूर ब्लास्टर्स विरुद्ध सानपाडा स्कॉर्पियन्स संघाने नाणेफेक जिंकून सुरुवातीला दमदार फलंदाजी केली. वरूण लवांडे (४६ चेंडूत ७६ धावा, ४ षटकार व ६ चौकार) व रोनंकी अनिलकुमार (२४ चेंडूत ३१ धावा, ३ षटकार व २ चौकार) यांनी आक्रमक फलंदाजी करून पहिल्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. परंतु त्यानंतर आलेल्या फलंदाजांना काबूत ठेवणारी मध्यमगती गोलंदाजी आकाश पारकर (३० धावांत ३ बळी) व साहिल फेगडे (३४ धावांत ३ बळी) यांनी केली. त्यामुळे सानपाडा स्कॉर्पियन्सला मर्यादित २० षटकात ७ बाद १४८ धावा नोंदविता आल्या. ओमकार उंबरकर (४० चेंडूत नाबाद ५० धावा, १ षटकार व ६ चौकार) व आशय सरदेसाई (२६ चेंडूत ३९ धावा, १ षटकार व ६ चौकार) यांच्या धडाकेबाज खेळामुळे बेलापूर ब्लास्टर्सने विजयी लक्ष्य १७.४ षटकात ३ बाद १५१ धावा फटकावीत सहज साध्य केले. दुसऱ्या सामन्यात सलामीवीर जय बिस्ता (३० चेंडूत ३३ धावा, ४ चौकार) व सामनावीर विश्वजित जगदाळे (२१ चेंडूत ३२ धावा, ३ षटकार व २ चौकार) यांच्या जलद फलंदाजीमुळे अंबरनाथ अवेन्जर्सने कोपरखैरणे टायटन्सची सर्वबाद १२८ धावसंख्या १८.४ षटकामध्ये ४ विकेटच्या मोबदल्यात ओलांडली.