मुंबई : महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून जगभरात नावलौकित असलेल्या मुंबई महानगराला आता सुदृढतेची आरोग्याची राजधानी म्हणून ओळख मिळावी या हेतूने बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘फिट मुंबई अर्ध मॅरेथॉन ’ आयोजित केली होती. या मॅरेथॉनला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अवघ्या बारा वर्षांच्या लहान मुलांपासून ते ८४ वर्षांच्या तरुणांपर्यंतच्या सुमारे ४ हजार २०० नागरिकांनी यात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे सर्वात ज्येष्ठ नागरिक ८४ वर्षीय रतनचंद्र ओसवाल यांची बायपास सर्जरी झालेली असतानाही त्यांनी १० किमी अंतर पार केल्याने त्यांचे कौतूक होत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मैं फिट तो इंडिया फिट’ या घोषणेसह ‘फिट इंडिया’ या अभियानाची सुरुवात केली. याच अभियानातून प्रेरणा घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेची अर्ध मॅरेथॉनचा ‘प्रोमो रन’ आयोजित करण्यात आली होती. सदर ‘प्रोमो-रन’ करिता स्टेट बँक ऑफ इंडिया (एस.बी.आय) मुख्य प्रायोजक होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, सह आयुक्त अजित कुंभार, भारतीय स्टेट बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक बी. शंकर व मुंबई मेट्रो परिमंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक जी. एस. राणा यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉन प्रोमो-रनचा शुभारंभ करण्यात आला.
आपल्या मुंबईला सुदृढतेची अर्थात फिटनेसची राजधानी करणे हाच ‘अर्ध मॅरेथॉन प्रोमो रन’चा एक महत्त्वाचा उद्देश होता. ही मॅरेथॉन ३ किलोमीटर, ५ किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा तीन अंतरांमध्ये पार पडली. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या शाळांमधील पन्नास विद्यार्थ्यांच्या वाद्यवृंद पथकाने देखील आपले कला कौशल्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. तर महानगरपालिकेच्या शाळेतीलच मुलांच्या आणखी एका पथकाने लेझीमची प्रात्यक्षिके सादर करून धावपटूंच्या धावण्याला वेगळ्या पद्धतीने सलामी दिली.
वय वर्षे ८४…बासपास सर्जरी…तरीही रतनचंद ओसवाल धावले …
‘फिटनेस दिलसे .. असे घोषवाक्य असणाऱ्या आजच्या प्रोमो-रन मध्ये होते. या मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकही मोठया संख्येने सहभागी झाल्याचे दिसून येत आले. विशेष म्हणजे धावपटूंमध्ये वयाने सर्वात ज्येष्ठ असणारे ८४ वर्षीय रतनचंद ओसवाल यांनी १० किलोमीटरचे अंतर धावत लिलया पार केले. विशेष म्हणजे ओसवाल यांची काही वर्षांपूर्वी हृदय शस्त्रक्रिया (बायपास सर्जरी) झाली असून हृदय शस्त्रक्रिया झाल्यानंतर वैद्यकीय मार्गदर्शन घेऊन त्यानुसार मॅरेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या ‘झिपर्स क्लब’चे ते सदस्य आहेत. आजच्या प्रोमो-रन दरम्यान धावण्याच्या मार्गावर विविध ठिकाणी वैद्यकीय व्यवस्था, रुग्णवाहिका व्यवस्था, प्रथमोपचार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय, साफसफाई इत्यादी व्यवस्था सक्षमपणे करण्यात आली होती.
शारीरिक सुदृढते बाबत जनजागृती करणे हाच उद्देश
कोविड संसर्गाच्या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेले आरोग्य व्यवस्थापन अवघ्या जगाच्या कौतुकास पात्र ठरले. कोविड दरम्यान आणि कोविड पश्चात प्रत्येक व्यक्तीसमोर आरोग्याची नवीन आव्हाने समोर उभी ठाकली आहेत. त्यामुळे शारिरिक आणि मानसिकदृष्टया स्वतःला सुदृढ ठेवणे प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक ठरले आहे. यासोबतच, आजच्या अत्यंत धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि शारीरिक कसरतींचा अभाव यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब सारख्या आजारांचे प्रमाण जगभरात वाढत आहे. मुंबईसारख्या कायम धावते असलेल्या महानगरात तर १८ ते ६९ या वयोगटातील सुमारे १८ टक्के व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक आढळले आहे. तर वर्ष २०२१ मध्ये वर्षभरात एकूण मृत्यू नोंदणीपैकी १४ टक्के मृत्येचे कारण मधुमेह नोंदविण्यात आले आहे. महानगरपालिकेने अलिकडेच केलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या `स्टेप्स’ सर्वेक्षणानुसार मुंबईतील ३४ टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाब तर १८ टक्के लोकांमध्ये मधुमेह आढळून आला आहे. ही बाब लक्षात घेता, शारीरिक सुदृढते बाबत सातत्याने जनजागृती होणे गरजेचे असून त्या हेतूने मॅरेथॉन प्रोमोरन चे आयोजन करण्यात आल्याचे महापालिकेने कळविले आहे.