शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची चौफेर कोंडी झाली आहे. त्यामुळे अस्तित्व टिकवण्याची धडपड त्यांच्याकडून सुरू असताना, आता ते चक्क राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या तयारीत आहे. रत्नागिरीमधील राष्ट्रवादीचा एक मोठा नेता ठाकरेंच्या गळाला लागला असून, लवकरच पक्षप्रवेश होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रत्नागिरीतील दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय कदम हे उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. त्याआधी ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांचे राजकीय विरोधक म्हणून ते ओळखले जातात. त्यामुळे कदम पिता-पुत्रांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून संजय कदमांना बळ दिले जाणार आहे.
उद्धव ठाकरे घेणार सभा
शिवसेना पक्ष हातातून निसटल्यांतर संघटनेची पुनर्बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः राज्यभर फिरणार आहेत. त्याची सुरुवात कोकणातून केली जाणार आहे. येत्या ५ मार्चला खेडमध्ये त्यांची सभा होणार असून, संजय कदम त्यावेळी हाती शिवबंधन बांधतील.