ठाणे, फेब्रुवारी २१, २०२३: ठाण्यातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित कोरम मॉलने शिवाजी जयंती निमित्ताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमात मुंबई आणि ठाण्यातील नामवंत चित्रकार उपस्थित होते. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारश्याचे कलात्मक सादरीकरण करून त्याद्वारे शिवरायांना आदरांजली वाहण्यासाठी ते जमले होते.
या कार्यक्रमात अंदाजे ५० कुशल कलाकार सहभागी झाले, ज्यांनी मंत्रमुग्ध करणारी चित्रे काढली आणि प्रेक्षकांनी देखील उत्साहाने आणि अभिमानाने त्यांची निर्मिती पाहिली. सुप्रसिद्ध आणि ख्यातनाम थ्रीडी पेंटिंग कलावंत श्री. शैलेश आचरेकर हे या स्पर्धेचे परीक्षक म्हणून उपस्थित होते. श्री. आचरेकर यांना १०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून त्यांच्या अद्वितीय चित्रशैलीसाठी त्यांच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा आहे. त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे थ्रीडी पेंटिंग बनविण्याचे स्वप्न मनात बाळगले आणि त्यास मूर्त रूप ही दिले. त्यांची ही अप्रतिम कलाकृती प्रेक्षकांना पाहण्यासाठी २६ फेब्रुवारी पर्यंत कोरम मॉल येथे उपलब्ध आहे.
या स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे (चढत्या क्रमाने): अजय पारकर (प्रथम क्रमांक), यशश्री देशमुख, योगेश पंडित, केविन दिअॅस, विक्रमादित्य घाग आणि आशा दोंदे. आशा दोंदे या ७५ वर्षीय उत्साही स्पर्धक होत्या ज्यांनी यावेळी त्यांची कलेबद्दल असलेली अफाट आवड आणि उत्साह दर्शविले. तर विक्रमादित्य घाग यांनी त्यांच्या कलाकृतीला खास कल्पक, नावीन्यपूर्ण व सर्जनशील बनवण्यासाठी प्रतापगड, तोरणा, रायगड आणि सिंहगड किल्ल्यांमधून गोळा केलेल्या मातीचा वापर केला. सर्व विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्रक देण्यात आले.
या पेंटिंग मॅरेथॉनच्या यशावर भाष्य करताना कोरम मॉलचे उपाध्यक्ष (व्हीपी) श्री. देवा ज्योतुला म्हणाले, “कोरम मॉल कलेचे महत्व वाढविण्यासाठी, त्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक कलावंतांना त्यांची प्रतिभा, सर्जनशीलता आणि कौशल्य प्रदर्शित करण्यास सहाय्य करण्यासाठी नेहमीच वचनबद्ध आहे. ही स्पर्धा म्हणजे आमच्या कोरम मॉलचे कला आणि संस्कृतीस समर्थन व पाठिंबा देण्याच्या आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारश्याला जतन करत साजरे करण्याच्या प्रयत्नांचे व त्यासाठी असलेल्या समर्पणाचे प्रमाण आहे. आम्ही सहभागी कलाकार आणि प्रेक्षकवर्गाचे आभार मानतो ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. २६ फेब्रुवारी पर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे थ्रीडी पेंटिंग पाहण्यासाठी कोरम मॉलला भेट देण्यासाठी आम्ही तुमचे स्वागत करतो.”