मुंबई : माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखानातर्फे क्रिकेटपटू स्व.प्रकाश पुराणिक स्मृती चषक माहीम ज्युवेनाईल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन १४ ते १८ फेब्रुवारीमध्ये शिवाजी पार्क मैदानात केले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यतेने होणाऱ्या स्पर्धेमधील उद्घाटनीय लढत ग्लोरियस सीसी वि. पार्कोफिन सीसी यामध्ये होईल. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वा. दादर-पश्चिम येथील एमजेएससी खेळपट्टीवर होईल. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी अजिंक्य नाईक उपस्थित राहणार आहेत.
विजेतेपद पटकाविण्यासाठी पय्याडे स्पोर्ट्स क्लब, माटुंगा जिमखाना, स्पोर्ट्स फिल्ड सीसी, कामत मेमोरियल, फोर्ट यंगस्टर्स, डीपीसी, एमआयजी सीसी, दहिसर एससी, स्पोर्टिंग युनियन दादर, राजावाडी सीसी, शिवाजी पार्क यंगस्टर्स, स्पोर्टिंग क्लब ठाणे, गौड युनियन, पीडीटीएसए आदी नामवंत १६ महिला संघ लढणार आहेत. अंतिम विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख पुरस्कारासह आकर्षक चषकाने गौरविण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सामनावीर आदी पुरस्कार देखील दिले जाणार आहेत.
माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लबचे माजी अध्यक्ष व क्रिकेटपटू स्व. प्रकाश पुराणिक यांची क्रिकेट क्षेत्रातील स्मृती कायम राहण्यासाठी प्रथमच माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लबद्वारे महिला क्रिकेट स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. दिग्गज क्रिकेटपटूसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवाजी पार्क मैदानाची ओळख भविष्यात महिला क्रिकेट खेळाडूंद्वारे देखील होण्यासाठी परिसरातील सर्व क्रिकेट संघ या स्पर्धेमुळे कार्यान्वित झाल्याची माहिती माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष विजय येवलेकर यांनी दिली.