फार्मा क्लस्टरसाठी नागपुरातील मिहान विशेष आर्थिक क्षेत्र उत्तम पर्याय – नितीन गडकरी
72 व्या इंडियन फार्मास्युटिकल कॉंग्रेसचे नागपुरात उद्घाटन
नागपूर 20 जानेवारी 2023 : भारतीय औषध उद्योगाला जगभरात चांगलीच ख्याती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे स्वस्त आणि दर्जात्मक उत्पादने तयार करण्यासाठी आपल्याला संशोधन आणि नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. हे झाले तर आपल्या फार्मा उद्योगांमध्ये असलेल्या निर्यातीच्या अफाट क्षमतांचा विस्तार होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या परिसरात आजपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय 72 व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी केले. याप्रसंगी भारताचे औषध महानियंत्रक – ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आणि नागपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ. वेणुगोपाल सोमाणी प्रामुख्याने उपस्थित होते. ही परिषद 22 जानेवारी पर्यंत नागपुरमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
याप्रसंगी गडकरी यांनी , फार्मा उद्योगात रोजगार निर्मितीची क्षमता असून सामाजिक आर्थिक परिवर्तन देखील घडवून आणण्याची क्षमता आहे. असे सांगितल . विविध क्षेत्रातील अधिकाधिक लोकांना फार्मा क्षेत्राशी जोडण्यासाठी अधिकाधिक कृषी आधारित उत्पादनांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
नागपूर हे देशाच्या मध्यभागी स्थित आहे आणि याठिकाणी उत्तम कनेक्टिव्हिटीसह भरपूर लॉजिस्टिक सुविधा आहेत. मिहान विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये जमीन, पाणी, वीज आणि औद्योगिक क्लस्टरच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिंदी ड्राय पोर्ट, समृद्धी महामार्गची उपलब्धता यामुळे नागपूरला अनेक दृष्टीकोनातून व्यवहार्य बनवले आहे आणि औषध उद्योगांनीही येथे आपले क्लस्टर स्थापन करण्याबाबत विचार करावा, असे आवाहन केंद्रीय नितीन गडकरी यांनी इंडियन फार्मास्युटिकल्स काँग्रेसमध्ये फार्मा कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना – सीईओ यांना केले. याशिवाय एम्स , वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, आयआयएम आणि इतर शैक्षणिक संस्थांची उपलब्धता कुशल मनुष्यबळ देऊ शकते ज्यामुळे स्थानिक रोजगाराला चालना मिळू शकते असेही ते म्हणाले .
भारतीय उत्पादने जगातील सर्वाधिक परवडणारी आणि दर्जेदार उत्पादने आहेत. जेनेरिक औषधांबरोबरच नावीन्य ही काळाची गरज आहे. यामुळे उत्पादन खर्च कमी करून औषधे सर्वांना परवडणारी बनविण्याच्या संधी शोधता येतील. फार्मा उद्योगाने प्रॉडक्ट बेस मॉडेलपासून सर्व्हिस बेस्ड मॉडेलवर काम करण्याची गरज आहे, असे मत डीजीसीआय डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांनी यावेळी मांडले .
या परिषदेच्या प्रसंगी , 72 व्या आयपीसीवरील स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते प्रख्यात फार्मासिस्ट तज्ज्ञांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाला डॉमिनिक जॉर्डन, इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनचे अध्यक्ष, 72 व्या आयपीसीच्या स्थानिक आयोजन समितीचे मुख्य संरक्षक आणि मार्गदर्शक, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन प्रतिनिधी, डॉ. जयंत चौधरी, अखिल भारतीय औषध नियंत्रण अधिकारी कॉन्फेडरेशन प्रतिनिधी अतुल कुमार नासा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, डॉ.प्रमोद खेडेकर , भारत बायोटेक इंडियन फार्मा ग्रॅज्युएट्स असोसिएशनचे एमडी डॉ. कृष्णा एल्ला, 72 व्या आयपीसीचे संघटन सचिव अतुल मंडलेकर व सचिव प्रा. प्रकाश इटनकर, समन्वयक डॉ.चंद्रकांत डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.विद्यापीठाच्या फार्मसी विभागाचे विद्यार्थी , फार्मा कंपनीचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते .