भाजपाच्या एका मंत्र्याने राज्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना भरसभेतून धमकी दिली आहे.
मध्य प्रदेशमध्ये भाजपाच्या एका मंत्र्याने राज्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना भरसभेतून धमकी दिली आहे. संबंधित भाजपा मंत्र्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना भाजपात सामील व्हा. अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या बुलडोझर कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहा” अशा आशयाची धमकी दिली आहे. भाजपा मंत्र्यांचं हे विधान कॅमेऱ्यात कैद झालं असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
महेंद्रसिंह सिसोदिया असं वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्याचं नाव आहे. ते मध्य प्रदेशचे पंचायत मंत्री आहेत. महेंद्रसिंग सिसोदिया हे बुधवारी गुना जिल्ह्यातील रुठियाई येथे एका राजकीय कार्यक्रमाला आले होते. यावेळी केलेल्या जाहीरसभेत त्यांनी हे विधान केलं. “भारतीय जनता पार्टीत सामील व्हा. हळूहळू आमच्या बाजुने (सत्ताधारी पार्टीत) या. २०२३ ला विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यात भाजपा सरकार स्थापन होईल. त्यानंतर मामा च्या बुलडोझरसाठी तयार राहा,” असं विधान सिसोदिया यांनी केलं.
खरंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ‘मामा’ या टोपणनावाने ओळखले जातात. अलीकडच्या काळात शिवराज सिंह यांनी गुन्हेगारांविरोधात कठोर धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार ते विविध गुन्ह्यांतील आरोपींच्या घरांवर कथित बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत बुलडोझर चालवत आहेत. याच पार्श्वभूमीवर सिसोदिया यांनी मध्य प्रदेशातील विरोधक काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांना धमकी दिली.
सिसोदिया यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ट्वीट केलं. असली भीती दाखवून काही उपयोग नाही. काँग्रेस पदाधिकारी असल्या धमक्यांना घाबरणार नाहीत. राघवगडवासीय निर्भयपणे मतदान करतील, असं दिग्विजय सिंह ट्विटमध्ये म्हणाले.