मैत्रीचे महत्त्व अनन्यसाधारण असते. आपण नेहमी ऐकत आलोय की मैत्री हे अतूट नाते असते, कधी न तुटणारे बंधन असते. अभिनेता ललित प्रभाकर आपल्या खास मित्राला ‘तुज्या स्टेटस ला, लाव फोटो माझा’ असं म्हणत फुल ऑन राडा घालणार आहे. आपल्या मैत्रीसाठी ललित काय ‘टर्री’गिरी करणार हे येत्या १७ फेब्रुवारीला ‘टर्री’ चित्रपटातून आपल्याला समजणार आहे. ‘ऑन युव्हर स्पॉट’ आणि ‘फॅन्टासमागोरिया फिल्म्स’ यांच्या सहयोगाने ‘टर्री‘ या डॅशिंग चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून प्रतीक चव्हाण, अक्षय आढळराव पाटील या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते महेश सहानी आणि सुबूर खान आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेते महेश रावसाहेब काळे यांनी चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे.
नाद करायचा नाय, आपल्या दोस्ताचा … तुज्या स्टेटसला, लाव फोटो माझा
क्षितीज पटवर्धन याने लिहिलेल्या या धमाल गाण्याला अवधूत गुप्ते, मनीष राजगिरे यांनी स्वरबद्ध केले आहे. प्रफुल्ल कार्लेकर-स्वप्नील गोडबोले यांचा संगीतसाज या गाण्याला लाभला आहे. या गाण्यातून दोन जीवाभावाच्या मित्रांची घट्ट मैत्री दिसून येते. उद्या हे गाणं रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘ऑन युव्हर स्पॉट ओरिजिनल्स’ च्या युट्युब चॅनलवर हे गाणं आपल्याला पहाता येईल.
‘टर्री’ चित्रपटात संग्राम आणि पै यांच्या मैत्रीची गोष्ट आहे. ललित प्रभाकर आणि योगेश डिंबळे यांनी या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर करत प्रत्येक प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी उभी राहत या दोघांनीं आपली मैत्री जपली आहे. अचानक या मैत्रीमध्ये वादळ निर्माण होतं याचा सामना हे दोन मित्र कसे करतात? या चित्रपटात पहायला मिळणार आहे. मजा, मस्ती, टशन आणि नात्यामधला ओलावा जपताना ‘टर्री’ कशाप्रकारे प्रत्येक कठिण प्रसंगामध्ये उभा राहतो? हे पहाणं रंजक असल्याचं, ललित सांगतो.
‘टर्री‘ चित्रपटात ललित प्रभाकर सोबत अभिनेत्री गौरी नलावडे दिसणार असून शशांक शेंडे, अनिल नगरकर, आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन अमोल गोळे यांनी केले असून संकलन श्रीराम बडवे, प्रवीण जहागीरदार यांचे आहे. एजाज गुलाब हे या चित्रपटाचे अॅक्शन डिरेक्टर आहेत.
१७ फेब्रुवारीला ‘टर्री‘ चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओ करणार आहे.
Link : https://youtu.be/zgd31W-K2vw