मुंबई : मागील काही दिवसांपासून दादरमधील फेरीवाल्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू असून यामुळे दादर पश्चिम रेल्वे स्थानकाचा परिसर फेरीवाला मुक्त झाला होता. त्यामुळे दादरकरांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. परंतु मागील आठ ते दहा दिवसांपासून महापालिकेच्यावतीने फेरीवाल्यांविरोधातील कारवाईचे नाटक आता संपले आणि पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी रस्ते आणि पदपथांवरील जागा अडवून फेरीचा व्यवसाय शो करण्यास सुरुवात केली. शनिवारी पुन्हा एकदा दादर परिसरात फेरीवाल्यांनी ठाण मांडून व्यवसाय केल्याने जनतेनेही आता महापालिकेपुढे हात टेकले आहेत.
दादरमध्ये बंगाली मुसलमान व्यवसाय करत असल्याने स्थानिक फेरीवाल्यांवर अन्याय होत असून स्थानिकांचा माल अडवून ठेवत अशा मुस्लिम फेरीवाल्यांचे सामान अडवून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृती विरोधात भाजपने आंदोलन पुकारत जमाल नावाच्या दलालाला अटक करण्याची मागणी भाजपने केली होती. या आंदोलनानंतर महापालिकेचे जी उत्तर विभाग व शिवाजीपार्क तसेच दादर पोलिसांच्या माध्यमातून या परिसरात फेरीवाल्यांना बंदी करण्यात आली होती. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून दादर परिसरात फेरीवाल्यांना व्यावसाय करण्यास मज्जाव करण्यात आला होता. तसेच मागील काही दिवसांपासून दादर फेरीवाला मुक्त झाल्याचे पहायला मिळत होते.
मागील काही दिवसांपासून दादरमध्ये सुरू असलेल्या फेरीवाल्यांवरील कारवाईमुळे दादरकर सुखावले होते आणि रेल्वे प्रवाशीही. या फेरीवाल्यांवरील कारवाईमुळे दादरमध्ये दरदिवशी निर्माण होणाऱ्याचे प्रमाण कमी झाले होते. शिवाय वाहतूक कोंडी थांबून यामुळे होणाऱ्या आवाजाचेही प्रदुषण कमी झाले होते. याबरोबरच रस्ते मोकळे असल्याने प्रवाशांसह जनतेला निट चालता येत होते. यासह या भागातील इमारतींमधील रहिवाशांना आपली वाहने तिथे उभी करता येत होती, तसेच रेल्वे स्थानकाकडेही वाहने नेता येत होती. त्यामुळे एकप्रकारे ही कारवाई दादरकरांच्या पथ्यावर पडलेली पहायला मिळत होती.
परंतु शनिवारी पुन्हा एकदा दादरमधील रानडे मार्ग, डिसिल्व्हा मार्ग, जावळे मार्ग, केळकर मार्ग आदी मार्गावर फेरीवाले मोठ्या प्रमाणात बसले. त्यामुळे मोठ्याप्रमाणात दादरचा परिसर गर्दीने फुलला होता. जिथे मागील काही दिवसांमध्ये रस्ते मोकळे पहायला मिळत होते, तिथे पुन्हा रस्ते आणि पदपथ फेरीवाल्यांनी अडवल्याने महापालिकेची नौटंकी संपली का असा जनतेच्या मनात निर्माण होऊ लागला आहे.