मराठी सिनेसृष्टीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आधारलेले सिनेमे बनत असतात. याहीपेक्षा काळानुरुप बदल करत नावीन्याच्या ध्यासानं मराठी सिनेमांची निर्मिती केली जाणं हा एक मराठी सिनेमांचा वेगळा पैलू नेहमीच जगासमोर आला आहे. विनोदी चित्रपटांच्या लाटेत एखादा असा चित्रपट येतो जो रसिकांसोबत सर्वांचंच लक्ष वेधून घेतो. विनोदी, आशयघन आणि मसालापटांच्या तुलनेत मराठीत भयपटांची संख्या फार कमी आहे. ‘डाक’ असं शीर्षक असलेला आगामी मराठी भयपट हिच उणीव भरून काढणार आहे. नुकतेच ‘डाक’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले.
महेश नेने प्रोडक्शनच्या बॅनरखाली ‘डाक’ या चित्रपटाची निर्मिती करण्याची जबाबदारी रतिश तावडे आणि महेश नेने यांनी स्वीकारली आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण रायगड जिल्ह्यातील नयनरम्य कोलाडजवळील बैजनाथ गावात करण्यात आले. ‘डाक’च्या माध्यमातून मराठी सिनेरसिकांसमोर भयपट सादर करण्याचं आव्हान महेश नेने यांनी स्वीकारलं असून, प्रगत तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण कथानकाच्या आधारे ते रसिकांना नवरसांमधील भय या रसाचा अनुभव देणार आहेत. महेश नेने यांनी यापूर्वी ‘चिमाजी अप्पा’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली असून, सध्या या चित्रपटाचं कामही वेगात सुरू आहे. हिंदीमध्ये रामसे बंधू आणि राम गोपाल वर्मा यांच्या भयपटांनी रसिकांच्या मनाचा थरकाप उडवला होता. त्याच वाटेनं जात ‘डाक’ हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवत थरारक अनुभव देणार असल्याचं जाणवतं. चित्रपटाचं नेमकं कथानक काय आहे हे सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं असलं तरी लवकरच याचं रहस्य उलगडणार आहे. हा चित्रपट मनात कुतूहल जागवणारा आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना एका अनोख्या विश्वाची सफर घडवत एक वेगळा अनुभव देणारा ठरेल असंच प्रथमदर्शनी वाटतं.
देवांग गांधी यांचे ‘डाक’ चित्रपटाला विशेष सहकार्य लाभ लाभले आहे. दिग्दर्शनासोबतच चित्रपटाची कथाही महेश नेने यांनीच लिहिली आहे. अश्विनी काळसेकर, संजीवनी जाधव, अनिकेत केळकर आदी कलाकारांनी या चित्रपटात विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.