कोल्हापूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने 2019 ला तीन वेगवेगळे पक्ष एकत्र आले. अन् नवी आघाडी स्थापन झाली. शिवसेना, राष्ट्रवादी अन् शिवसेना हे तीन वेगवेगळी वैचारिक बैठक असणारे पक्ष सत्तेत आले. त्यानंतर मागच्या वर्षी शिवसेनेत मोठी फूट पडली अन् एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी केली. हे बंड करत असताना त्यांनी महाविकास आघाडीसोबतच्या अनैसर्गिक युतीचं कारण दिलं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत राजकीय वर्तुळात अनेकदा चर्चा होतेय. या आघाडीबाबत शरद पवार यांनी महत्वाचं विधान केलंय.
आम्ही चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही अनेक प्रश्नावर एकत्रित निर्णय घेतो. उद्याच्या निवडणुकीसाठीही एकत्रित भूमिका घ्यायला काही अडचण येणार नाही, असं शरद पवार म्हणाले.
शिंदे-फडणवीसांना सल्ला
शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्लाही दिलाय. सत्ता हातात आल्यावर जमिनीवर पाय ठेवून राहायचं असतं. मात्र आता मी पाहतोय काही लोक टोकाची भूमिका घेत आहे. जामीन रद्द करतो, अटक करतो अशी भाषा वापरली जात आहे. हे योग्य नाही. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे शोभणारं नाही, असं शरद पवार म्हणालेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कालच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय. “भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखावी. आधीचे राज्यपाल चांगले होते. आताचे राज्यपाल सतत वादग्रस्त वक्तव्य करतात”, असं म्हणत शरद पवार यांनी कोश्यारींच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका केली आहे.