पिंपरी-चिंचवड : पुणे: महाराष्ट्र हे राज्य सर्वार्थाने श्रीमंत आहे. एखादा उद्योग राज्याबाहेर गेल्याने महाराष्ट्राला फरक पडत नाही. पण म्हणून सर्व बडे उद्योग प्रकल्प गुजरातलाच नेणे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नाही, असे परखड मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले. आपण गुजरातचे आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य देणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नाही. आधीचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे पंजाबी होते मग त्यांनी काय फक्त पंजाब राज्यापुरतं पाहावं का? उद्या आसामचा कोणीतरी होईल त्यांनी तसंच करायचं का? भारत हा एकसंध देश आहे, हेनुसतं बोलण्यापुरतं आहे का? एकसंधपणा असा असतो का, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. ते रविवारी पुण्यातील जागतिक मराठी संमेलनच्या व्यासपीठावरुन बोलत होते.
मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढत आहेत. अशात मनसे भाजपच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या युतीची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलीय. ते पिंपरी चिंचवडमधील जागतिक मराठी संमेलनात बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त एका राज्याकडे पाहु नये, हे मी 2014 ला ही म्हणालो होतो आणि आज ही माझी तीच भूमिका आहे. 2014 नंतर मला ज्या गोष्टी बोललो त्याचं पुढे काय झालं आपण पाहिलं. त्यातल्या काही गोष्टी पटल्या नाहीत. त्यामुळे 2019 ला लाव रे ते व्हिडिओ कॅम्पेन केलं, असं राज ठाकरे म्हणालेत.
राजकारण चांगले बदल व्हायला हवेत. एकमेकांच्या विरोधात बसलेले एकत्र कसे आले? पहाटे शपथविधी घेतात ते का? नंतर बदलतात, असंही राज ठाकरे म्हणालेत.
राजकारण म्हणजे फक्त निवडणुका जिंकणं नाही. राजकारणाला सामाजिक कामाचा आधार लागतो. परिस्तिती बदलायची असेल तर तुम्ही राजकारणात या. मी तुमच्या सोबत काम करायला तयार आहे, असं आवाहनही राज ठाकरे यांनी कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांना केलं आहे.