तेलुगू सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते चलपती राव यांचे रविवारी (25 डिसेंबर) सकाळी वयाच्या 78व्या वर्षी निधन झाले. चलपती यांना आज सकाळी त्यांच्या घरी हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. चलपतींच्या निधनामुळे संपूर्ण तेलुगू फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. चलपती यांनी त्यांच्या कारकीर्दीत 600 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चलपती दीर्घकाळापासून आजाराने त्रस्त होता. चलपती राव यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
28 डिसेंबरला होणार अंत्यसंस्कार
चलपती यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ‘चलपती राव यांची मुलगी अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांचे पार्थिव बंजारा हिल्स येथील रवी बाबू यांच्या घरी रविवारी दुपारपर्यंत चाहत्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येईल. बुधवारी (28 डिसेंबर) दुपारी 3 वाजेनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
1966 मध्ये चलपती यांच्या करिअरला सुरुवात
चलपती राव यांचा जन्म 1944 मध्ये आंध्र प्रदेशात झाला. सीनियर एनटीआर यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. 1966 मध्ये रिलीज झालेल्या ‘गुदाचारी 116’ या चित्रपटातून चलपतींनी आपल्या करिअरची सुरुवात केली. चलपती हे विनोदी भूमिकांसाठी आणि खलनायक म्हणूनही ओळखले जातात.
निर्माताही होते चलपती
चलपती यांनी ‘साक्षी’, ‘ड्रायव्हर रामुडू’, ‘वजराम’ इत्यादी 600 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच ते बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘किक’ या चित्रपटातही दिसले होते. अभिनयासोबतच त्यांनी निर्मिती क्षेत्रातही काम केले. त्यांनी ‘कलियुग कृष्णदू’, ‘कडप्पा रेडम्मा’, ‘जगन्नाटकम’ ‘पेलांटे नूरेला पंता’, ‘प्रेसिडेंटिगरी अल्लुडू’, ‘अर्धारात्री हात्यालू’ आणि ‘रक्तम चिंदिना रात्रि’ या चित्रपटांची निर्मिती केली होती.