आरोग्य तज्ज्ञांच्या समितीकडून नेझल कोरोना व्हॅक्सिन वापरण्यास मंजुरी देण्यात आल्यानंतर भारत बायोटेकची नेझल कोरोना वॅक्सिन आता कोविन CoWin अॅपवर उपलब्ध आहे. भारत बायोटेकची iNCOVACC या इंट्रानेझल कोविड-19 लसीचा पर्याय शनिवारी संध्याकाळीपासून कोविन ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र भारत बायोटेककडून अद्याप लसीची किंमत आणि वापरासाठी उपलब्धता जाहीर करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात या संदर्भात निर्णय अपेक्षित असून भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला बूस्टर डोस म्हणून वापराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
जगात कोरोनाचा उद्रेक होत असून भारतात ओमायक्रॉनच्या सबव्हेरियंटचे तीन रुग्ण सापडल्याने प्रशासन अलर्टवर मोडवर आहे. बुधवारपासून केंद्र सरकारने कोरोनाबाबत अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी असे सांगितले की, DGCI ने या लसीच्या वापराला मंजुरी दिल्यानंतर हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीच्या नेझल कोरोना वॅक्सिन म्हणजेच नाकावाटे घेण्यात येणाऱ्या लसीच्या आपात्कालीन वापराला आरोग्य तज्ज्ञांच्या समितीने मंजुरी दिली आहे.
भारत बायोटेकची इंट्रानेझल कोविड लसीचा पर्याय कोविन अॅपवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच ही नेझल कोरोना वॅक्सिन खासगी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असणार आहे. या लसीचा बूस्टर डोस म्हणून वापर करता येईल, १८ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना नेझल कोरोना वॅक्सिनचा बू्स्टर डोस घेता येईल, असेही त्यांनी सांगितले.